बाप्पामुळे कष्टकर्यांची उपासमारीपासून सुटका
| रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन भक्तिभावाने करण्यात आले असले तरी सार्वजनिक गणेशोत्सव अद्याप जोरात सुरू आहे. बाप्पामुळे कित्येक हौशी कलावंत, कामगार, विक्रेते या सर्वच घटकांच्या हाताला काम आणि कष्टाचे दाम मिळते. त्यामुळे दरवर्षी कष्टकरी लोक गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. गणेशोत्सव हा सर्वांचाच आवडीचा आणि भक्तिभावाने साजरा होणार सण आहे. त्यामुळे या सणाची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. गणेशोत्सवाला व्यावसायिक रंग आल्याने मोठी आर्थिक उलाढाल होताना दिसते.
मंडप कामगार, मूर्तिकार, गायक, वादक, निवेदक, पेंटर, अन्य कामगार, ढोल पथक, मंडप कामगार, महिला बचत गटांना गणेशोत्सव काळात रोजगार निर्माण होतो. फुगेविक्रेते, फूलविक्रेते, बॅनर, मखरविक्रेते, महिला बचत गट, फटाके, मिरवणूक ट्रक, ढोल पथके, तसेच मोदक, लाडू, केळी, अन्य फळ, भेल, आईस्क्रीम, पाणीपुरी, चाट, डोसा, कॉर्न, पॉपकॉर्न, मंच्युरियन विक्रेत्यांचा या काळात धंदा तेजीत असतो. त्यामुळे कित्येकांच्या पोटाचा प्रश्न मार्गी लागतो. एरव्ही हाताला काम मिळत नसल्याने जगायचे कसे, असा प्रश्न उभा असताना गणेशोत्सवामुळे उदरनिर्वाह होतो.
हाताला काम मिळत नसल्याने उपासमार सुरू आहे. त्यातच गणेशोत्सव काळात 10 दिवस काम मिळाले. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे. आता नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सण कधी येतो त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय.
– शैलेश भगत रंग कामगार, भिलजी
कोरोनापासून कार्यक्रम फारसे मिळत नाहीत. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. गणेशोत्सवासारख्या उत्सवांमध्ये काही कार्यक्रमात काम मिळते. थोडेफार मानधन मिळते, त्यावर कसेतरी जगतो.
– प्रेम धनावडे, नृत्य कलाकार
आमचा ढोल-ताशांचा पारंपरिक व्यवसाय आहे. लग्न सराईत काही ऑर्डर मिळतात, मात्र खरा धंदा हा गणपती सणाला होतो. त्यामुळे उपासमारीची वेळ येत नाही.
– नितेश झावरे, वाद्यवृंद मालक