। पनवेल । वार्ताहर ।
महाशिवरात्रीनिमित्त खांदा वसाहत सेक्टर दोनमध्ये खांदेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आले होते. यावेळी खांदेश्वर सरोवराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर मोठी जत्रा भरविण्यात आली होती. या जत्रेत परराज्यांतील व्यावसायिकांकडून विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. मात्र, जत्रा संपल्यावर दुसर्या दिवशी गुरूवारी या ठिकाणी रस्त्यावर कचर्याचे साम्राज्य पहायला मिळाले. परप्रांतीय स्टॉल धारकांनी आपले स्टॉल उचलून कचरा मात्र तेथेच टाकून पसार झाले होते. या कचर्यामुळे खांदा वसाहतीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला.
या जत्रेदरम्यान मोठ्या उलथापालथी होत असतात. मात्र, जत्रेच्या अगोदर परप्रांतीय स्टॉल धारकांना स्टॉल लावण्याकरिता पालिकेची परवागी होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, पालिका या स्टॉल धारकांना नोटीस तसेच कचरा करणार्यांना दंड का आकारतं नाही, असा संतप्त प्रश्न खांदा वसाहतील नागरिकांना पडलेला आहे. दरम्यान, पालिकेच्या स्वच्छता दूतांकडून पाच टनहुन अधिक कचरा गोळा करण्यात आला आहे.