आठवडा बाजार संपतो, मात्र कचऱ्याचे साम्राज्य कायम!

दुर्गंधी,अस्वच्छतेचा रहिवाशांना त्रास; पालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

। खांदेश्वर । प्रतिनिधी ।

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भरणाऱ्या आठवडा बाजारात विविध प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी मोठ्या संख्येने विक्रेते येत असतात. संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत या बाजारात खरेदी-विक्रीची मोठी लगबग सुरू असते. मात्र, बाजार संपल्यानंतर विक्रेते आपापले साहित्य घेऊन निघून जातात; पण त्यांनी दिवसभरात निर्माण केलेला कचरा मात्र त्याच ठिकाणी सोडून दिला जात असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे.

भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थांचे अवशेष, प्लास्टिक पिशव्या, कागद आणि इतर टाकाऊ वस्तू रस्त्यावर व परिसरात पडून राहतात. रात्रीच्या वेळी या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे तो जागेवरच सडू लागतो. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरते. दुसऱ्या दिवशी सकाळी या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील रहिवाशांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो.

विशेष म्हणजे आठवडा बाजार बंद करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात असताना, प्रत्यक्षात या परिसरात बाजार भरतोच कसा, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. बाजाराला परवानगी आहे की नाही, विक्रेत्यांवर नियंत्रण कोणाचे आहे आणि बाजार भरत असल्यास स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज आहे.

आठवडा बाजाराच्या ठिकाणी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, बाजार संपल्यानंतर तेथील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी नेमके कुठे असतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विक्रेत्यांना कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे का? बाजार संपल्यानंतर स्वच्छता कर्मचारी तातडीने साफसफाई करतात का? याची पाहणी करण्याची आवश्यकता आहे.

शहर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने महापालिका विविध स्वच्छता अभियान राबवित असते. मात्र, आठवडा बाजाराच्या ठिकाणीच अशा प्रकारे कचरा साचत असेल, तर या अभियानांचा उपयोग काय, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

विक्रेत्यांनी व्यवसाय करावा, मात्र परिसर अस्वच्छ करून नव्हे! प्रत्येक विक्रेत्याला कचरा जमा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देणे, बाजार संपल्यानंतर तातडीने साफसफाई करणे, कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या विक्रेत्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करणे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित पाहणी करणे आवश्यक आहे.

आठवडा बाजार भरविण्याबाबत पालिकेची नेमकी भूमिका काय आहे आणि बाजारानंतरच्या स्वच्छतेची जबाबदारी कोण पार पाडणार, याचे उत्तर पनवेल महानगरपालिका प्रशासनाने द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बाजारातील खरेदी-विक्रीची गजबज संपल्यानंतर नागरिकांच्या वाट्याला कचरा आणि दुर्गंधीच येणार असेल, तर शहराच्या स्वच्छतेचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Exit mobile version