स्थानिकांसह पर्यटकांनी अस्वच्छतेबाबत व्यक्त केली नाराजी
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
अलिबाग एसटी बस स्थानकामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कचर्याचा ढिगारा पडून आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अलिबागमध्ये दाखल झालेल्या पर्यटकांसह स्थानिक प्रवाशांनी स्थानकातील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.पर्यटन व ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखल्या जाणार्या अलिबागमधील कचर्याबाबत अनेकांनी नाक मुरडले. याकडे एसटी बस आगार व्यवस्थापक गांभीर्याने लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एसटी बस आगार व स्थानक आहे. अलिबाग एसटी बस आगारात 63 हून अधिक एसटी बसेस आहेत. रोहा, पनवेल, मुरूड, कर्जत, खोपोली, पुणे, मुंबई, शिर्डी, नाशिक अशा अनेक ठिकाणी एसटी बसेस जातात. एसटीतून प्रवास करणार्याची संख्या प्रचंड आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आदी प्रवासी एसटीतून नियमीत प्रवास करतात. अलिबाग स्थानकात प्रवाशांची कायमच वर्दळ राहिली आहे. अलिबाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने या ठिकाणी येणार्यांची संख्यादेखील वाढू लागली आहे. नाताळ व थर्टी फर्स्टच्या निमित्ताने पर्यटक रायगड जिल्ह्यात आले. मात्र अलिबाग एसटी बस स्थानकात कचर्याचा ढिगारा पाहून अनेकांनी अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. अलिबाग स्वच्छ शहर म्हणून ओळखले जात असताना स्थानकात असलेल्या कचर्याबाबत नाकच मुरडले. अलिबाग स्थानकात गेल्या अनेक दिवसांपासून हा कचरा पडून आहे. परंतु तो कचरा काढून परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत आगारातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन ठरली आहे. हा कचरा तातडीने काढण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे.
बसेस वेळेवर सोडण्याचा प्रयत्न राहणार
अलिबाग स्थानकातून प्रवास करणार्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी एसटी बस आगारामार्फत तयारी केली जाणार आहे. स्वच्छतेबरोबरच एसटी बसेस वेळेवर सोडण्याचा मानस आहे. खड्ेमय रस्त्यांमुळे बसेस रस्त्यात बंद पडतात. बसेसमध्ये बिघाड होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. यावर्षात त्या पध्दतीने नियोजन करण्यात येणार आहे. त्या पध्दतीने कामकाज करण्याचा प्रयत्न आहे, असे आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी सांगितले.
सीएनजी पंपाचे काम सुरु होते. त्यामुळे तो कचरा पडून आहे. कचरा काढण्यासाठी यंत्रणा राबविण्यात आली होती. परंतू कचर्याची वाहतूक करणारे टॅ्रक्टर न आल्याने स्थानकात कचरा पडून आहे. नगरपरिषदेच्या मदतीने हा कचरा लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
– राकेश देवरे,
व्यवस्थापक-अलिबाग एसटी