। रायगड । प्रतिनिधी ।
एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी नवीन वर्षात प्रोत्साहन भत्ता योजना राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेंतर्गत चालक – वाहकांसाठी 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता देण्याचे ठरविले आहे. वाढीव उत्पन्नावर चालक वाहकांना कमिशन देण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी दिली. या योजनेमध्ये प्रत्येक क्रू ड्युटीचे निव्वळ वाहतूक उत्पन्न जानेवारीच्या उत्पन्नावर आधारित उद्दिष्ट काढण्यात येणार आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करून त्यापेक्षा जास्त वाढीव उत्पन्न आणले तर वाढीव उत्पन्नापैकी 20 टक्के रक्कम ही प्रोत्साहन भत्ता म्हणून चालक-वाहक यांना समप्रमाणात तत्काळ रोखीने देण्यात येणार आहे.
अशी असेल योजना
ही योजना अमलात आणण्यासाठी उद्दिष्ट उत्पन्न निर्धारित करण्यात येणार असून उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देणार्या कर्मचार्यांना प्रोत्साहनपर रोख रक्कम मिळणार आहे. ड्युटीचे उद्दिष्ट उत्पन्न दहा हजार रुपये असेल. जास्त मिळालेल्या दोन हजार रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के म्हणजेच चारशे रुपये प्रोत्साहन भत्ता कर्मचार्यांना मिळेल. यामध्ये दोनशे रुपये चालकाला तर दोनशे रुपये वाहकास असे दोघांना सम प्रमाणात रोखीने देण्यात येणार आहे.