आवक कमी झाल्याने लसणाच्या दरात तेजी

| रायगड | प्रतिनिधी |

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत आहे. यंदा उत्पादन कमी असल्याने बाजारात कमी प्रमाणात लसूण येत आहे. त्यामुळे लसणाच्या दरात सतत वाढ होत असून महिनाभरापूर्वी 120 ते 200 रुपये किलो असणारा लसूण आता घाऊक बाजारात 230 ते 370 रुपये किलो आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लसूण 400 रुपयांच्या घरात आहे.

आठ महिन्यांपासून लसणाच्या दरात वाढ सुरू झाली आहे. 80 ते 100 रुपये किलो असणारा लसणाचा दर 100 रुपये किलोपासून वाढत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातून लसणाला पर्याय आहे. महिन्याभरापूर्वी लसणाच्या दरात वाढ झाली होती. तेव्हा चांगला लसूण 200 रुपये किलोपर्यंत गेला होता.

मात्र आता या आठवड्यात लसणाच्या दराने आणखी उसळी घेतली असून चांगला लसूण घाऊक बाजारातच 370 रुपये किलोपर्यंत आणि किरकोळ बाजारात 400 रुपयांवर गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या दोन वर्षांत लसणाचे दर तुलनेने कमी होते. घाऊक बाजारात लसूण 50 ते 80 रुपये किलोपर्यंत होता. उत्पादन खर्चही निघत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी लसणाचे उत्पादन घेणेच थांबवले होते. त्यामुळे बाजारात लसणाची कमतरता जाणवायला लागली आहे.

नवीन आवकपर्यंत हीच स्थिती
एपीएमसी घाऊक बाजारात लसणाच्या दैनंदिन सहा ते सात गाड्यांची आवक होत होती. मात्र, आता केवळ एक किंवा दोन गाड्यांची आवक होत आहे. त्यातच मार्केटमधील व्यापाऱ्यांकडे असणारा लसूण संपलेला असल्यामुळे दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात लसणाचे दर चढेच राहणार असून नवीन आवक सुरू झाल्यानंतर दर आटोक्यात येण्यास सुरुवात होईल.
Exit mobile version