। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
पेंडूर घोडेमुख येथे खोल विहिरीत अडकलेल्या खवले मांजराची ग्रामस्थांच्या मदतीने सुटका करण्यता आली आहे. याप्रकरणामुळे, सिंधुदुर्गवासीयांच्या वन्यजीवांबद्दल असणार्या प्रेमाची पुन्हा एकदा प्रचिती आली.
अधिकच्या माहितीनुसार, भगवान वासुदेव गावडे यांना, त्यांच्या घरामागील कठडा नसलेल्या विहिरीत खवले मांजर पडल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ, पेंडूर घोडेमुख सरपंच श्रीमती गीतांजली कांबळे यांच्या माध्यमातून वनविभागास याबाबत माहिती दिली. वनविभागाच्या बचावपथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत 10 ते 12 फूट खोल विहिरीतून त्या खवले मांजरास स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले.
हे बचाव कार्य उपवनसंरक्षक सावंतवाडी शहाजी नारनवर, सहायक वनसंरक्षक आय. डी. जालगावकर व वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मठ अ. स. चव्हाण, वनरक्षक मठ सूर्यकांत सावंत, वनमजुर संतोष इब्रामपुरकर, वाहनचालक राहुल मयेकर यांनी स्थानिक ग्रामस्थ देवा कांबळी, विजय मोरजकर, श्याम गावडे, गोविंद गावडे, शांताराम गावडे, रविंद्र गावडे, महेश नाईक यांच्या मदतीने यशस्वी केले.
पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. येथील ग्रामस्थांनी खवले मांजराचा जीव वाचवून वन्यप्राण्यांबाबत असणार्या संवेदनशीलता आणि आत्मीयतचे चांगले उदाहरण समाजासमोर ठेवल्याने वनविभागाच्या वतीने सर्वांचे कौतुक करून आभार मानण्यात आले.