| महाड | वार्ताहर |
महाड शहरात वृद्ध महिलेला फसवून दागिने लंपास करण्याची घटना जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. या प्रकरणातील आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला चोर सराईत गुन्हेगार असून, खादीम हुसेन सय्यद उर्फ इराणी असे याचे नाव आहे.
महाड शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जानेवारी रोजी शहरातील कुंभार आळी परिसरात एका वृद्ध महिलेला फसवून सोन्याची चेन व सोन्याची बोरमाळ घेऊन चोरटे फरार झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, महाड शहर पोलिसांना या चोराची माहिती मिळाल्यानंतर त्यांना आंबिवली तालुका कल्याण येथून अटक करण्यात आली आहे. खादीम हुसेन सय्यद उर्फ इराणी (35) रा. इराणी वसती, असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. माणगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे हजर केले असता 30 जानेवारीपर्यंत कस्टडी मिळाली आहे. यातील अन्य चोरांचादेखील लवकर छडा लावला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या तपास पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अंमलदार विकास सुतार, प्रतीक कदम यांचा समावेश होता. पोलीस पथकाने मोठ्या चतुराईने चोरावर झडप घालून या इराणी चोराला पकडल्याने पोलिसांचे महाड तालुक्यात कौतुक होत आहे. याबाबत अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करत आहेत.