आठ जणांना अटक
। मुंबई । प्रतिनिधी ।
घाटकोपर येथील एका बारमधील व्यवस्थापक आणि वेटर यांनी केलेल्या मारहाणीत 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून मृत व्यक्तीचे वडिलही जखमी झाले आहेत. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून व्यवस्थापक तसेच, आठ वेटर्सना अटक केली आहे.
तक्रारदार किरण लालन (61) आणि त्यांचा मुलगा हर्ष लालन (40) कामानिमित्त घाटकोपर येथे गेले होते. ‘हेडक्वार्टर बार व रेस्टॉरन्ट’चे मालक परिचयाचे असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी तेथे गेले. यावेळी हर्षने बारच्या व्यवस्थापकाकडे मालकाबद्दल विचारणा केली. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यवस्थापकाने हर्षसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर व्यवस्थापक व तेथील सात-आठ वेटर्सनी हर्षला लाथा-बुक्याने मारहाण केली. यावेळी तक्रारदार किरण लालन मुलाला वाचवण्यासाठी तेथे गेले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या हर्ष यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी लालन यांनी टिळक नगर पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून बार व्यवस्थापक संतोष शेट्टी (42), वेटर शाहिद अन्सारी (24), पट्टूस्वामी गौडा, भगवान सिंह, सुनील रवाणी, राजेश यादव, सोहेल हुसैन आणि अमर पाटील यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.