। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील वाचकांच्या हक्काचे व्यासपीठ असलेले कृषीवलमार्फत कृषीवलच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने खालापूरमध्ये महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. बुधवारी (दि.29) सायंकाळी चार ते सात यावेळेत हा सोहळा खालापूर फाटा येथे रंगणार आहे.
‘दिवस सन्मानाचा नारी शक्तीच्या अस्मितेचा’ या कार्यक्रमात विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार असून, कर्तृत्वान महिलांचा विशेष सन्मान होणार आहे.
महिला सशक्तीकरणासाठी गेली अनेक वर्षे कृषीवल हळदीकुंकू समारंभ आयोजित करीत आहे. या कार्यक्रमाला सर्व स्तरातील महिलांशी संवाद साधण्याबरोबरच मनमोकळे करण्यासाठी वर्षोनुवर्षे असलेली ही परंपरा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कृषीवलने महिलांचा हा सन्मान जपण्याचा प्रयत्न केला आहे. यंदादेखील महिलांच्या हक्काचे व सौभाग्याचे प्रतीक समजल्या जाणार्या हळदीकुंकूचा समारंभ बुधवारी (दि.29) सायंकाळी चार ते सात यावेळेत साजरा होणार आहे.
खालापूर फाटा येथील श्रीकृष्ण पेट्रोल पंपाजवळ, कटरमल मैदानात हा सोहळा रंगणार आहे. हळदीकुंकू लावून, औक्षण करून महिलांना सौभाग्याचे वाण यावेळी दिले जाणार आहे. तसेच खास महिलांसाठी इतर स्पर्धा होणार आहेत. सोनाली पवार यांचे नृत्य सादरीकरण होणार असून, महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. तसेच कर्तृत्वान महिलांचा विशेष सन्मान या सोहळ्यानिमित्त होणार आहे. जिल्ह्यातील महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.