समाजकंटकांवर राहणार पथकाची नजर; रायगड पोलिसांचा अभिनव उपक्रम
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
महापुरुषांसह देव, देवतांच्या पुतळ्यांची विटंबना रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या संकल्पनेतून गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. समाजकंटकांवर नजर ठेवण्याचे काम या पथकाच्या माध्यमातून होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात हा उपक्रम सुरू केला आहे. पुतळ्यांची विटंबना करणार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी रायगड पोलिसांचा हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची आणि संविधान प्रतीची विटंबना समाजकंटकांनी केली. या घटनेनंतर रायगड पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात तीनशेहून अधिक वेगवेगळया प्रकारची पुतळे आहेत. श्रद्धास्थान असलेल्या पुतळ्यांची विटंबना रोखण्यासाठी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या संकल्पनेतून गुड मॉर्निंग पथक सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात 28 पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यात हे स्कॉड उभारण्यात आले आहेत. या स्कॉडमध्ये दोन कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातील हद्दीमधील वेगवेगळ्या पुतळ्यांची पाहणी पथकामार्फत केली जाते. सर्व पुतळ्यांची पाहणी करून ते पुतळे सुस्थितीत असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांना दिली जाते. जिल्ह्यातील होणारी पुतळ्यांची विटंबना रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी हा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील 28 गुड मॉर्निंग स्न्वॉडद्वारे समाजकंटकांवर नजर ठेवण्याचे काम केले जात आहे. पोलिसांच्या या उपक्रमामुळे समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जवळपास तीनशेहून अधिक पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी राजे आंगे यांच्यासह विविध नेत्यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे.
कसे असेल पथकाचे काम
गुड मॉर्निंग पथक प्रत्येक दिवशी पहाटे पाच वाजता पुतळा आणि परिसराची पाहणी करतील. दरम्यान, कोणी माथेफिरु अथवा समाजकंटकाने काही उपद्रव केला असेल, तर त्याविरोधात तात्काळ कार्यवाही करेल. तसा अहवाल सकाळी सहा वाजेपर्यंत संबंधित पोलीस ठाण्यात देण्यात येईल. या पथकामध्ये दोन पोलीस कर्मचार्यांचा समावेश असेल.