वाढत्या महागाईत गणवेशासाठी फक्त 240 रुपयांचे अनुदान
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शाळा सुरू होण्यासाठी अवघे वीसहून अधिक दिवस शिल्लक असताना विद्यार्थ्यांच्या गणवेशासह वह्या-पुस्तकांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशासाठी अनुदान दिले जाणार आहे. मात्र, यावर्षी शासनाकडून पूर्ण निधी न मिळाल्याने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गणवेशाच्या रकमेवर कात्री लागली आहे. तीनशे रुपयांऐवजी केवळ 240 रुपयेच एका गणवेशामागे दिले जाणार असल्याने वाढत्या महागाईच्या काळात शासन विद्यार्थ्यांची थट्टा करत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या तब्बल दोन हजार 473 शाळा असून, या शाळांमध्ये सुमारे 98 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांनी शाळेकडे आकर्षित व्हावे, शाळेत रमावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दप्तराविना शाळा यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक तसेच शारीरिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सध्या जिल्हा परिषद शाळांना उन्हाळी सुट्टी असून, 15 जूननंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवसापासून गणवेश उपलब्ध व्हावा यासाठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत गणवेशासाठी निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील मुले आणि इतर मागासवर्गीय घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणीमुळे खंड पडू नये, यासाठी शासनाने मोफत गणवेश योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 89 हजार 728 विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी शासनाकडून दोन कोटी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, यावर्षी शासनाकडून केवळ 80 टक्के निधी प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाच्या अनुदानात कपात करण्यात आली आहे. परिणामी, तीनशे रुपयांच्या अपेक्षित रकमेऐवजी फक्त 240 रुपये विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. सध्याच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एवढ्या कमी रकमेत विद्यार्थ्यांचा गणवेश कसा तयार होणार, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.
विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच गणवेश मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळा व्यवस्थापन समित्यांकडे गणवेशाची रक्कम वितरित केली जाणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती, सर्वसाधारण इतर मागासवर्गीय तसेच दारिद्य्ररेषेखालील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यावर्षी शासनाकडून 80 टक्के निधी प्राप्त झाल्याने 240 रुपयांप्रमाणे अनुदान वितरित केले जाणार आहे.
मनिषा दहितुले,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग







