| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमधील खरबाची वाडी येथील पाण्याची विहिरीला येथील फार्महाऊस मालकाने ताबा मिळवला होता. मात्र, स्थानिक आदिवासी लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने आदिवासी कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेकडे तक्रार केली. शेवटी आदिवासी संघटनेने आक्रमक भूमिका घेत ती विहीर पुन्हा आदिवासी लोकांसाठी खुली करून दिली आहे. दरम्यान, याच ग्रामपंचायतीमधील धोत्रेवाडी येथील पाण्याची विहीर देखील येथील फार्महाऊस मालकाने ताब्यात घेऊन पाणी देण्यास नकार दिला होता.
पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील खरबाचीवाडी येथे शासनाच्या निधीमधून विहीर बांधली आहे. त्या विहिरीतून पाणी घेऊन बाराही महिने आपली तहान भागवतात. उन्हाळ्यात तर या भागात मोठी पाणी टंचाई निर्माण होत असल्याने आदिवासी लोकांना पाण्याचे साधन होते. खरबाचीवाडी ही सुमारे 45 घरांची आदिवासी वस्ती असून येथील ही विहीर अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या वापरात आहे. मात्र, शासनाच्या निधीमधून बांधलेली विहीर येथील एका मुंबईतील फार्महाऊस मालकाने लोखंडी जाळी लावून बंद केल्याची घटना समोर आली. विहीर लगतची जमीन एका मुंबईतील धनिक व्यक्तीने खरेदी केली आहे. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी विहिरीच्या वर लोखंडी जाळी लावून ती पूर्णपणे बंद केली. ही बाब समजताच खरबाचीवाडी आणि शिलार गावातील महिलांनी संबंधित व्यक्तीकडे जाऊन जाब विचारला. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तुम्हाला जे करायचे आहे ते करा, अशी असे उद्धट उत्तर दिली. तसेच तालुक्यातील आदिवासी समाज संघटनांनाही याबाबत माहिती देण्यात आली. ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येऊन आक्रमक भूमिका घेत विहिरीवर लावलेली लोखंडी जाळी काढून टाकली.
ग्रामअधिकाऱ्यांकडे केली तक्रार
आदिवासी ग्रामस्थांनी आदिवासी संघटनांच्या कानावर घातली. स्थानिक महिलांनी आक्रमक भूमिका घेत हस्तक्षेप केल्याने अखेर ती विहीर पुन्हा खुली करण्यात आली. यानंतर ग्रामस्थांनी पाथरज ग्रामपंचायत ग्रामअधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली.
