सरकारची दडपशाही! 15 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

एमपीएससी परीक्षार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न?

| पुणे | प्रतिनिधी |

एमपीएससी परीक्षार्थ्यांच्या आंदोलनाला दिलेली परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी 15 विद्यार्थी प्रतिनिधींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने या कारवाईवरून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांशी चर्चा करून आंदोलन स्थगित झाल्याचे सांगणाऱ्या सरकारकडून दुसरीकडे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष विशाल तांबे यांनी केला असून, हे गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.

एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधींनी 25 सप्टेंबर रोजी आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार 2 ऑक्टोबर रोजी पुण्यातील लोकमान्य टिळक चौक (अलका टॉकीज), अहिल्या अभ्यासिका आणि नवी पेठेतील गांजवे चौक परिसरात आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, 30 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले. त्यामुळे आंदोलनाची परवानगी रद्द करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींना देण्यात आली होती. त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास नवी पेठेतील इंदूलाल कॉम्प्लेक्ससमोर विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे वाहने अडवली गेली आणि लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली, असा आरोप पोलिसांनी केला आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार समीर पवार यांच्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलिसांनी प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, अनिकेत देशमाने, प्रवीण पाटील, ऋषिकेश गांगुर्डे, प्रियांका चौधरी, नितीन गिते, सोमनाथ चव्हाण, ओंकार पाटील, गजानन शेळके, अजित काकडे, सिद्धार्थ पंचांगे, संकेत कणसे, सिद्धार्थ जांभुळकर आणि साहेबराव क्षीरसागर या 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे तपास करत आहेत.

गुन्हे मागे घ्या; अन्यथा तीव्र आंदोलन
विद्यार्थ्यांवरील कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष विशाल तांबे यांनी निषेध केला. सरकार एकीकडे चर्चेचे नाटक करत असून, दुसरीकडे परीक्षार्थ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मागण्या मान्य झाल्याचे सांगून विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करणे ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तांबे यांनी दिला.
Exit mobile version