शरद पवारांचे टीकास्त्र
। पुणे । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत आहेत. त्यांच्या वर्तनाने राज्याची प्रतिमा मलिन होत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी केली आहे. पुणे येथे शनिवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, हे राज्यपाल आल्यानंतर अनेक प्रकार घडले. महाराष्ट्रात यापूर्वी सी प्रकाश हे राज्यपाल होते. त्यावेळी मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. राज्याचे राज्यपाल सी प्रकाश यांचं त्यावेळी देशात आणि देशाबाहेर नावलौकिक होता. त्यांना मी राज्यपाल म्हणून पाहिलं आहे. त्याचबरोबर या राज्यात पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखा कर्तृत्ववान राज्यपाल मी स्वतः पाहिला आहे. अशा राज्यपालांमध्ये हल्लीच्या राज्यपालांचं नाव ऐकायला मिळतं यावर भाष्य न केलेलं बर. केंद्र सरकारच्या कामाची पातळी घसरतेय ते कुठपर्यंत घसरत गेलेत याची अनेक उदाहरण आहेत. त्याची ही कामगिरी महाराष्ट्रातही पहायला मिळत आहे
विधानसभा आणि विधानपरिषदेचे सभासद नेमण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. वर्ष होऊन गेलं तरी या सदस्यांच्या नियक्त्या होत नाहीत. याचा अर्थ काय की, राज्यपालपदाची प्रतिष्ठा महाराष्ट्रात अनेकांनी सांभाळली ती प्रतिष्ठा आम्ही ठेवणारच नाही, असा निर्धार करुन कोणी काम करत असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं. असा शब्दांत शरद पवार यांनी राज्यपालांच्या कार्यपद्धतीवरही सडकून टीका केली.
महाराष्ट्राला अनेक कर्तृत्ववान राज्यापालांचा वारसा आहे. त्यात आजच्या राज्यपालांबाबत भाष्य न केलेलंच बरे. राष्ट्रपती आणि पतंप्रधान यांनी याचा विचार करावा.
– शरद पवार, राष्ट्रवादी अध्यक्ष
सरकार संविधानानुसार काम करत नसून, ज्याप्रकारचे कायदे आणि कायदा दुरुस्ती सरकार करत आहे ते कुठेच संविधानाच्या नियमांमध्ये बसत नाहीत. जेव्हा राज्यपाल याकडे लक्ष वेधतात तेव्हा त्यांना टार्गेट केलं जातं. त्यांचा अपमान केला जातो. हे पूर्णपणे चुकीचं आहे.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते