ग्रामपंचायतींनी विकास आराखडा तयार करावा

डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणी, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या बाबींचा अभ्यास करून परिपूर्ण असा स्वत:चा विकास आराखडा तयार करावा, तसेच आपली ग्रामपंचायत आदर्श ठरण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अलिबागमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांना केले.

जिल्ह्यातील निवडक सरपंच व ग्रामसेवक यांची प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प अंमलबजावणीसाठी कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या कै. ना.ना. पाटील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. डॉ. किरण पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपापल्या ग्रामपंचायतीत घनकचरा वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कार्यान्वित करावी. प्लास्टिक कचरा संकलन करून तो पुनर्प्रक्रिया करण्यासाठी कंपन्या तसेच इतर ठिकाणी पाठविण्यात यावा. तसेच आपली ग्रामपंचायत आदर्श होण्याच्या दृष्टीने सर्वांनी जोमाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामे हाती घेऊन ग्रामपंचायतींनी लवकरच प्लास्टिक केंद्रांची संकलन केंद्रांची उभारणी करावी, असे पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव उपस्थित होते.

यावेळी प्लास्टिक संकलनात काम करणार्‍या लहाज प्रतिष्ठान मुंबई, आम्ही संस्था मुंबई, स्वदेश फाऊंडेशन माणगाव, जे.एस.डब्ल्यू कंपनी डोलवी, ग्रीन फाऊंडेशन मुंबई, इकोसत्व संस्था मुंबई या स्वयंसेवी संस्था व कंपन्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Exit mobile version