। मुरुड । वार्ताहर ।
सध्या पावसाच्या प्रमाणात खंड पडत असल्यामुळे भात पिकावर खोडकिडा व पाने गुंडाळणार्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे मुरुड तालुक्यातील उसडी, वाणदे, मजगाव, म्हाळुंगे बु, वळके या गावांमध्ये प्रातिनिधीक स्वरूपात तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत रोहा येथील कृषी विज्ञान केंदाचे शास्त्रज्ज्ञ जीवन आरेकर यांच्या क्षेत्रीय भेटीचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
यावेळी प्रत्यक्ष शेतकर्यांचा शेतावर जावून त्यांना व लगतच्या शेतकर्यांना किडींचा प्रादूर्भाव कसा असतो, नुकसान कशा प्रकारे होवू शकते, किड नियंत्रणासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे, याविषयी शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित शेतकर्यांना किड नियंत्रणासाठी शेतामध्ये ठराविक अंतरावर पक्षी थांबे उभे करण्याविषयी मार्गदर्शन केले. सदर किडींचे प्रमाण सध्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली आहे. खोडकिडा नियंत्रणासाठी एकरी 8 कामगंध सापळे वापरावेत. एकरी एक प्रकाश सापळा लावावा. बांध स्वच्छ ठेवावेत तसेच क्विनॉलफॉस 10 मिली प्रती 10 लिटर पाणी किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड या किटकनाशकांची 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातून फवारणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ यांनी केले.
तसेच क्रॉपसॅप योजनेमधून सदर किडींच्या प्रादूर्भावाबाबत नियमित ऑनलाईन सर्वेक्षण सुरु आहे. त्याप्रमाणे शेतकर्यांना दापोली विद्यापीठाकडून येत असलेल्या सूचना शेतकर्यांना देण्यात येतात. सदर भेटीच्या वेळी मंडळ कृषी अधिकारी रविंद्र सैंदाणे तसेच कृषी सहाय्यक गिरजा अंभोरे, मनोज कदम आदी उपस्थित होते.