गुकेशने तब्बल सहा तास झुंजवले
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय खेळाडूंनी चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत दमदार कामगिरी करताना सलग सातव्या फेरीत विजय मिळवला आहे. भारतीय खेळाडूंनी खुल्या गटात चीनला कडवी टक्कर दिली. हा सामना 1.5-1.5 असा निर्णायक वळणावर असताना जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या गुकेशने सहा तास चीनच्या खेळाडूला झुंजवले. गुकेशने सहा तास चाललेल्या लढतीत चीनच्या वेई यी याच्यावर विजय मिळवून भारताचा 2.5-1.5 असा विजय निश्चित केला. 80व्या चालीत गुकेशने चिनी खेळाडूला हार मानण्यास भाग पाडले.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या डिंग लिरेन याने गुकेशसोबतची लढत टाळली होती. यामुळे वेई सातव्या फेरीत भारतीय खेळाडूविरुद्ध खेळला. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होणार्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत गुकेश विरुद्ध डिंग असा सामना रंगणार आहे. गुकेशने विजय मिळवण्यापूर्वी यांगई यू विरुद्ध प्रज्ञानंदा, अर्जुन एरिगैसी विरुद्ध बू झिंगझी आणि वांग यूई विरुद्द पी हरिकृष्णा या लढतीत बरोबरीत सुटल्याने दोन्ही संघांचे 1.5-1.5 असे गुण झाले होते. यामुळे गुकेश व वेई यांच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.