दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यांदाच मात
। नोएडा । वृत्तसंस्था ।
अफगाणिस्तान संघाने एकदिवसाय क्रिकेटमध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवण्याचा भीम पराक्रम केला आहे. यावेळी द. आफ्रिकेचा संपूर्ण संघ 106 धावांवर तंबूत पाठवल्यानंतर अफगाणिस्तानने 26 षटकांत सहा गडी राखून विजयाची नोंद केली आहे.
द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. रिझा हेंड्रिक्स (9), टॉनी डी जॉर्जी (11), कर्णधार एडन मार्करम (2), त्रिस्तान स्तब्स (0), कायले वेरेयने (10) आणि जेसन स्मिथ (0) यांना माघारी पाठवून आफ्रिकेची अवस्था 7 बाद 36 अशी केली होती. एँडील फेहलुकवायो शून्यावर धाव बाद झाला. वियान मुल्डर व बीजॉर्न फॉर्टूइन या दोघांनी 40 धावा जोडल्या. यावेळी मुल्डरने 84 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 52 धावा केल्या. आफ्रिकेचा डाव 33.3 षटकांत 106 धावांवरच आटोपला. अफगाणिस्तानच्या फारुकीने 4, घाझनफरने 3 आणि राशिदने 2 बळी घेतले.
अफ्रिकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा रहमनुल्लाह गुरबाज भोपळ्यावर माघारी परतला. रहमत शाहही 8 धावाच करू शकला. अफगाणिस्तानने 4 फलंदाज 60 धावांवर गमावले. पण, अझमतुल्लाह ओमारजाई (25) व गुलबदीन नइब (34) यांच्या नाबाद खेळीने संघाला 6 गडी राखून विजय मिळवून दिला. अफ्रिकेच्या बी जॉर्न फॉर्च्युनने दोन बळी घेतले.