रेल्वे प्रशासनाच्या आरपीएफ बॅरिकमध्ये हाॅकर्सचा खुलेआम व्यवसाय

। रसायनी । राकेश खराडे ।

कर्जतहून पुण्याकडे जाणा-या रेल्वे महामार्गावर लोणावळा हे पर्यटन स्थळ असून येथे येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. मौजमजा करण्यासाठी आलेले हे पर्यटक बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याला अधिक पसंती दर्शवितात. यातच लोणावळा रेल्वे स्थानकातून रेल्वेने प्रवास करत असताना हाॅकर्सकडून खाद्यपदार्थ विकत घेतात. यातील अधिकृत आणि अनधिकृत हाॅकर्स कोण हे पर्यटक पडताळून पाहत नसल्याने काही पर्यटकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यातील प्रकार पर्यटक व काही प्रवाशांच्या लक्षात आल्यावर काहींनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी हाॅकर्स व्यवसायात काही अनधिकृत हाॅकर्स आपल्याजवळील खाद्यपदार्थांची विक्री करीत असल्याचे दिसून आले.


आरपीएफ बॅरिकच्या रुममध्ये खाद्यपदार्थ विकणा-या हाॅकर्सकडून अनधिकृत किचन थाटून याच किचनमध्ये इडली, मेंदूवडा व इतर खाद्यपदार्थ बनवून यानंतर रेल्वे स्थानके व रेल्वे प्रवाशांना विकण्याचा धंदा खुलेआम तेजीत सुरू असल्याचे चित्र दिसून येते. आरपीएफ बॅरिकमध्ये किचन थाटल्याने स्वच्छतेचे आसपासच्या परिसरात तीन तेरा वाजल्याचे दृष्य दिसते. अशा किचनमध्ये बनविलेल्या खाद्यपदार्थांमुळे रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो.

लोणावला या स्थानकापासून इतर स्थानकांवर खाद्यपदार्थ विक्रेत्या हाॅकर्सची वाढती संख्या पाहता, ते येतात कुठून, त्यांचे पोलिस व्हेरीफिकेशन आहे का? या हाॅकर्सकडे ओळखपत्र आहे का? याची कोणीही चौकशी करताना दिसत नसून त्यांना कोणत्याही प्रकारची भिती नसल्याचे ऐकावयास मिळत आहे. अशा हाॅकर्स विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने रेल्वे प्रवासी वर्गातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.



रेल्वे प्रवाशांत याविषयक जोरदार चर्चा सुरू आहे. यातच कर्जतहून पुण्याकडे जाणा-या रेल्वेने प्रवास करत असताना या हाॅकर्सकडून एखादा गुन्हा घडल्यास हे परप्रांतीय हाॅकर्स मंडळी आपल्या राज्यात निघून गेल्यावर खरा गुन्हेगार कोणाला समजावा? हा प्रश्न निर्माण होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन असे अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या हाॅकर्ससह त्यांना पाठिंबा देणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी वर्गातून होत आहे.

लोणावळा रेल्वे स्थानके तसेच रेल्वेमध्ये विक्रीला आणलेले खाद्यपदार्थ हे काही हाॅकर्स मंडळी लोणावळा आरपीएफ बॅरिकमध्ये खाद्यपदार्थ बनवून विक्री करतात, यावेळी काही रेल्वेप्रवाशांशी वादही करतात, अशा अनधिकृत हाॅकर्स मंडळींची आरपीएफ खात्याने चौकशी करून कारवाई करावी.

जगदिश दगडे (रेल्वे प्रवासी)
Exit mobile version