सुधागड तालुक्याचे ‌‘आरोग्य’ सलाईनवर

वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 50 टक्के पदे रिक्त

| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील मंजूर 57 पदांपैकी तब्बल 28 पदे रिक्त आहेत. अतिशय गंभीर बाब म्हणजे, पाच वैद्यकीय अधिकारी मंजूर पदांपैकी तीन पदे रिक्त आहेत. यामुळे तालुक्यातील नागरिकांना वेळेवर योग्य उपचार मिळताना अडचणी येत आहेत. त्यांची गैरसोय होत आहे. शिवाय, उपलब्ध डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.

तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या पाली शहरातील प्राथमिक केंद्रातील दोन्हीही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत, तर जिल्हा परिषद दवाखाना खवली येथील एक वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रवर साधारण 43,810 इतकी, तर जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर साधारण 28,861 इतकी लोकसंख्या अवलंबून आहे.

सुधागड तालुक्यात 108 गावे असून, तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे या भागात सर्पदंशाचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असतात. मात्र, उपकेंद्रामधील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या घटना घडतात. शिवाय गरोदर महिला, अपघातग्रस्तांना योग्य व वेळेवर उपचार मिळत नाहीत. गरोदर महिलांना प्रसूतीसाठीसुद्धा अलिबागला जावे लागते. सुधागड तालुक्यातील नागरिकांसाठी अतिशय अत्यावश्यक असणाऱ्या आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले असून, आरोग्य विभाग हे सद्यःस्थितीत सलाईनवर आहे, त्यामुळे आरोग्य विभागाच्या या उदासीनतेबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रिक्त पदे
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सेविका 17 मंजूर पदांपैकी 13 रिक्त, आरोग्य सेवक 7 मंजूर पदांपैकी 5 रिक्त, औषध मिश्रक 3 मंजूर पदांपैकी 2 रिक्त, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2 मंजूर पदांपैकी 1 रिक्त, शिपाई 4 मंजूर पदांपैकी 2 रिक्त, कुष्ठरोग तंत्रज्ञ 2 मंजूर पदांपैकी 2 दोन्ही पदे रिक्त, वैद्यकीय अधिकारी 5 मंजूर पदांपैकी 3 रिक्त अशी एकूण 28 रिक्त पदे सुधागड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात आहेत.
लसीकरण औषधोपचार रखडतात
आरोग्य सेविकांची मंजूर 17 पदांपैकी तब्बल 13 पदे रिक्त असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. परिणामी, सर्व प्रकारचे लसीकरण, पोलिओ डोस, विविध आजारांची नोंद व औषधोपचार, रोग प्रतिबंधक कामे, आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्य शिक्षण, गरोदर स्त्रिया व विद्यार्थी यांची तपासणी, शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहोचविणे आदी कामे रखडतात व वेळेत होत नाहीत.
नाईलाजास्तव खासगी रुग्णालयाचा आधार
सध्या सर्वत्र डेंग्यू, मलेरिया, टायफाईड अशा आजारांची साथ सुधागड तालुक्यात आहे. तालुक्यातील जे नागरिक आर्थिक सक्षम आहेत, ते खासगी रुग्णालयातून वेळेवर उपचार घेत आहेत. मात्र, तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेला गोरगरीब, खेड्यापड्यात दुर्गम भागात राहणारा आदिवासी बांधव हे शासनाने दिलेल्या आरोग्य सेवेवरच विसंबून राहतात. परंतु, रिक्त पदांमुळे तेथे त्यांना आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव त्यांना पदरमोड करून खासगी रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागत आहे. तर कधी पैशांअभावी उपचारांवर पाणी सोडावे लागत आहे.

तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदांसंदर्भात दर महिन्याला लेखी अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सादर करण्यात येतो. याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहोत. सद्यःस्थितीत पाली प्राथमिक आरोग्य केंद्र व खवली जिल्हा परिषद दवाखान्यातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पदांचे काम राष्ट्रीय बाल संस्थांमधील वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने आरोग्य सेवा देणे सुरू आहे.

डॉ. शशिकांत मढवी, तालुका आरोग्य अधिकारी, सुधागड तालुका

अतिशय गंभीर परिस्थिती तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे. शासनाने व सरकारने लवकर ही रिक्त पदे भरावी.

प्रकाश पालकर, सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version