तीन ते चार महिन्यांचे अनुदान थकले
। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलमधील शिवभोजन केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास तीन ते चार महिन्यांचे अनुदान थकले असल्याने अनुदान कधी मिळेल, असा सवाल उपस्थित झाला आहे. पनवेल पुरवठा विभागाकडून होत असलेल्या उशिरामुळे त्यांच्या अनुदानाला विलंब झाला आहे.
शिवभोजन थाळीचा लाभ पनवेल परिसरातील अनेक गोरगरीब नागरिक घेत आहेत. सद्यस्थितीत 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी मिळत आहे. ही योजना पनवेल परिसरात यशस्वी झाली आहे. मात्र तीन ते चार महिन्यांपासून शासनाकडून अनुदान प्राप्त झालेले नसल्याने केंद्र चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पनवेल तालुक्यात शहरी भागात 10 आणि ग्रामीण भागात 9 अशी जवळपास 19 केंद्र आहेत. दररोज अंदाजे दोन हजारपेक्षा जास्त थाळींचे प्रत्यक्ष वाटप केले जाते. ग्रामीण भागासाठी 25 रुपये प्रति थाळी आणि शहरी भागासाठी 40 रुपये प्रति थाळी अनुदान मिळते. मात्र सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्याचे अनुदान मिळण्यासाठी पनवेलच्या पुरवठा विभागाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे बिले वेळेवर पाठवण्यात आले नाहीत. त्याचा फटका केंद्रचालकांना बसत आहे. जिल्हा प्रशासनाकडे पुरेसा निधी असूनही पुरवठा विभागाच्या दिरंगाईमुळे हे अनुदान रखडले आहे. अनेक शिवभोजन चालक उसनवारी करून केंद्र चालवत आहेत. प्रत्येक महिन्याचे बिल दुसर्या महिन्यात अनुदान मिळण्यासाठी पुढे पाठवावे लागते. मात्र तब्बल तीन महिने हे पुढे पाठवले नसल्याने तीन ते चार महिन्याचे अनुदान थकले आहे. पुरवठा विभागाच्या निष्क्रियतेमुळे केंद्र चालकांचे अनुदान थकले असल्याचा आरोप केंद्र चालक करत आहेत.
डिसेंबर एंडिंगला आमच्याकडे अनुदानाची बिले आली आहेत. पाच-सहा दिवसात त्यांच्या अनुदानाचे काम होईल.
सर्जेराव सोनवणे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, अलिबाग