पुढील तीन दिवस उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतीय हवामान खात्याने उष्ण वाऱ्यांमुळे कोकण, गोव्यासहीत मुंबईमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली असून पुढील तीन ते चार दिवस नागरिकांनी उन्हात फिरताना अधिक काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे.

१४, १५, १६ मार्च रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा समान प्रभाव जाणवणार आहे. १४ आणि १५ तारखेला सर्वाधिक जास्त उष्णता असेल तर १६ तारखेला तुलनेने कमी उष्णता असली तरी सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय. पुढील दोन दिवस म्हणजेच १७ आणि १८ मार्च रोजी वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये १४ तारखेला सर्वाधिक उष्णता जाणवेल तर १५ आणि १६ तारखेलाही तुलनेने कमी पण नेहमीपेक्षा अधिक उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्येही इतर जिल्ह्यांप्रमाणे वातावरण पुढील काही दिवस कोरडं असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Exit mobile version