मराठवाड्यालाही झोडपले
| रत्नागिरी | वार्ताहर |
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मराठवाड्यात दोन दिवसांपासून पुनरागमन केले असून सोमवारी ही ठिकठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन काढणीत शेतकर्यांन व्यत्यय येत आहे. छत्रपती संभाजीनगरात गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे. जालना शहरात दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्धा तास पडलेल्या या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. बीड जिल्ह्यात काल दुपारपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली.
गेल्या 24 तासांत 28.4 मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे शेतामध्ये सोयाबीन काढणार्या शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतामध्ये पाणी साचून इतर पिकांचे नुकसान होत आहे. हिंगोलीसह जिल्ह्यात सलग तिसर्या दिवशी सोमवारी पाऊस झाला. गेल्या 24 तासांत 2.80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली—खेड, रत्नागिरीत जोरदारखेड/रत्नागिरी : विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाला सुरवात झाली. खेड, सावर्डेसह रत्नागिरी तालुक्यात जोरदार पाऊस पडला. किनारपट्टी परिसरात वेगवान वारे ही वाहत होते. या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. या पावसाचा फटका भातशेतीला बसला असून अनेक ठिकाणी उभी रोपे आडवी झाली आहेत. कापणीयोग्य भात रोपांसाठी हा पाऊस त्रासदायक ठरु शकतो.
सिंधुदुर्गात आज पुन्हा पावसाने झोड उठविली. दरम्यान, मुसळधार पावसामुळे सायंकाळी भुईबावडा घाटात तीन ते चार ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे शेकडो वाहने घाटरस्त्यात अडकून पडली आहेत.जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला विजांच्या लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटांसह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मुसळधारेने हळव्या भात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. भुईबावडा घाटात सायंकाळी तीन ते चार ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे शेकडो वाहने घाट रस्त्यात अडकून पडली होती. घाट रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. घाट रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्याने तसेच हा एकमेव घाट सुरू असल्याने वाहनचालकांचे मोठे हाल झाले. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. हा जोर आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने मंगळवारी (दि.24) ”आँरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात उद्यादेखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे.