| कोर्लई | प्रतिनिधी |
जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक चिंतेत होते. मात्र, सोमवारी झालेल्या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना चालना मिळणार असून, पाणीसाठ्यांमध्येही काही प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे. तसेच, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकरी राजा देखील सुखावला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात मंगळवारी (दि.23) सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सकाळी 8.00 वाजेपर्यंत 150 मि.मी.तर दुपारपर्यंत 199 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील विविध ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्याने शेतीमध्ये सुद्धा पाणी साचले होते. आता मुरुड शहरातील पंचक्रोशीतील भागातील पेरणीच्या हंगामास निश्चितपणे सुरुवात होईल, अशी परीस्थीती आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतीची आंतरमशागत, बांधबंधीस्ती, जनावरांचे वैरणाचा भरणा, गोठा बांधणी इत्यादी कामांना प्राधान्य दिले होते. खरीपाच्या पेरणीची तयारी या भागात शेतकऱ्यांनी केली असून, केवळ पेरणीयोग्य पावसाची प्रतिक्षा शेतकरी करत होते. पावसाच्या आगमनाने सर्वत्र समाधान व्यक्त होत असले तरीही अजूनही सुरुवातीला भरपूर प्रमाणात पाऊस होणे आवश्यक आहे. त्यामुळे पेरण्या प्रारंभ जरी होत असल्या तरी या भागात जोरदार पावसाची अपेक्षा शेतकरी करीत आहेत. तर, ज्या ठिकाणी भातशेतीचे राब उशीरा टाकले गेले तेथील राब पाण्यात वाहून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तसेच, समुद्राला मोठे उधाण असल्याने जंजिरा किल्ल्यासमोर उंच लाटा उसळत होत्या. या लाटांचे तांडव पाहण्यासाठी खोरा बंदरात पर्यटक व नागरिक हजेरी लावत होते.
मुरूड तालुक्यात दमदार पाऊस
