नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना रोहयोतून मदत; सरकारची माहिती

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेतून मदत देण्यात आली आहे. या निधीतून 3076.34 हेक्टर क्षेत्राकरिता 5602 नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लाभ देण्यात आला असल्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. याबाबतचा प्रश्‍न आ. जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.

रोहयो मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात असे म्हटले की, विभागाच्या दिनांक 19 मार्च, 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये 1400.00 लक्ष निधीपैकी रायगड जिल्ह्यास मागणीप्रमाणे 1316.81 लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.

मूळ प्रश्‍नात आ. जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सुपारी क्षेत्र सुमारे 724 हेक्टर, नारळ क्षेत्र 752 हेक्टर, काजू क्षेत्र 1 हजार 200 हेक्टर, आंबा क्षेत्र 8 हजार 113 हेक्टर व चिकू क्षेत्र 322 हेक्टर असे एकूण 11 हजार 281 हेक्टर बागायत क्षेत्र जून, 2020 मध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळात बाधित झाले, असे म्हटले आहे. नुकसानग्रस्त बागायतदार शेतकर्‍यांना रोहयोतून पुनर्लागवड आणि पुनर्जीव योजना सुरू करण्यात आली होती. अनेक शेतकर्‍यांनी या योजनेतून लागवड केली असून, दोन वर्षे त्यांची चांगली जोपासना करून झाडे जिवंत ठेवली आहेत. तशी कृषी विभागाकडून संबंधित बाधित बागायतदारांच्या झाडांची पाहणीदेखील करण्यात आली असूनही रोहयोतून जाहीर झालेली मदत येथील बागायतदार शेतकर्‍यांना अद्याप देण्यात आली नाही. जाहीर झालेली मदत देण्याबाबत कोणती उपाययोजना करण्यात आली, अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली होती.

Exit mobile version