महेंद्र गायकवाड ठरला हिंद केसरी

फायनलच्या आखाड्यात मोठा वाद; पृथ्वीराज मोहोळची माघार

। सातारा । प्रतिनिधी ।

सातारामधील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या 52 व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत वाद पाहायला मिळाला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये ही लढत पार पडणार होती. परंतु लढत सुरू झाली आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने डाव टाकताना हाताला इजा झाली. हाताची वेदना असह्य झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने पृथ्वीराज मोहोळ याने मैदानातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. अखेर बाहुबली म्हणून राज्यभर नावलौकिक मिळवणारा महेंद्र गायकवाड हा हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे.

तीनवेळा उपमहाराष्ट्र केसरी राहिलेल्या महेंद्रला विजयी घोषित केल्यावर अश्रू अनावर झाले. यंदा फायनलमध्ये दोन्ही महाराष्ट्राचे मल्ल असल्यामुळे हिंद केसरीची गदा महाराष्ट्रातच येणार होती. पण कुस्तीशौकिन झालेल्या प्रकारामुळे नाराज झाले. त्यांनी हवी अशी कुस्ती पाहायला मिळाली नाही. महेंद्र गायकवाड हा महाराष्ट्राचा 10 आणि देशाला 39 वा हिंदकेसरी ठरला आहे. हिंद केसरीची गदा आणि थार गाडी महेंद्र गायकवाड याने जिंकली.

नेमका वाद काय?
हिंद केसरी फायनलमध्ये कुस्तीला सुरूवात झाल्यावर महेंद्र गायकवाड याने आक्रमक पवित्रा घेतला होता. पृथ्वीराज मोहोळवर त्याने आक्रमण करत दोन गुण मिळवले. ज्यावेळी पृथ्वीराज खाली होता, तेव्हा त्याचा उजवा हात पकडत डाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान पृथ्वीचा हात उलटा झाल्याने आक्षेप घेण्यात आला. कुस्ती थांबवण्यात आली होती, पृथ्वी खेळायला तयारही झाला होता. मात्र त्याचा हात अजिबातच हलत नव्हता. शेवटी महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आले.

तीनवेळा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये पराभव स्वीकारणाऱ्या महेंद्रने फायनला येईपर्यंत अनेक नामवंत आणि मोठ्या पहिलवानांना पराभूत केलं होतं. यामध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा मान मिळवणाऱ्या विजय चौधरी यांनाही त्याने पराभूत केले होते. फायनलला झालेल्या प्रकारावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी महेंद्रवर टीका केली आहे.

दरम्यान, या स्पर्धेमध्ये देशभरातील 28 राज्यांतील सुमारे 850 मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत महिला व पुरुष दोन्ही गटांतील महालढती पार पडल्या. भारतीय शैली कुस्ती महासंघ, राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मोहोळ आणि गायकवाड यांनी उपांत्य फेरीत उत्तर भारतीय मल्लांचे वर्चस्व मोडून काढत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.

Exit mobile version