भंगार गोळा करणार्यांवर संशय
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील सासवणे येथे भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी शुक्रवारी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीमध्ये एका भंगारवाल्याचा सहभाग असल्याचा संशय निर्माण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सासवणे येथील इंद्रप्रस्थ या ठिकाणी मुंबई येथील एका व्यक्तीचा बंगला आहे. या बंगल्यामध्ये केअर टेकर म्हणून एक कामगार आहे. बुधवारी दुपारी तो कामगार त्याच्या गावातील घरी गेला होता. या संधीचा फायदा घेत भंगार गोळा करणार्यांनी बंगल्यातील दरवाजाचा कुलूप तोडला. ते घरात घुसून रोख रकमेसह काही साहित्य लंपास केले. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणारे भंगार गोळा करणारे असून त्यात एका महिलेचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार अंकुश सोळसे करीत आहेत.