। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा,आळी आंबिवली डोंगरी विभागात बंद असलेल्या घरामध्ये आग लागल्यामुळे घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाल्याची घटना घडली. वंदना सदाशिव ढवाळकर यांचे मोहोपाडा मार्केटमध्ये अगरबत्ती विकण्याचे दुकान आहे व त्यांचे डोंगरी येथे राहते घर आहे. त्या घराला लॉक लावून बाजारपेठेत आपल्या दुकानात असताना त्यांच्या राहत्या घरात अचानक आग लागली.
शेजारी राहणार्यांना घरातून जळालेला वास आल्यामुळे त्यांनी तत्काळ वंदना सदाशिव ढवाळकर यांना बोलावून घेतले व अग्निशामक दलाला पाचारण करून विजमंडळ कर्मचा-यांनाही कळवले. स्थानिक नागरिकांच्या व अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी घरामध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन आग विझवली. परंतु घरामधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या.
यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अश्वनाथ खेडकर व त्यांच्या टिमने तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आग कोणत्या कारणाने लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.