चार जण जखमी
। जळगाव । प्रतिनिधी ।
जळगावच्या पारोळा तालुक्यातील म्हसवे फाट्यावर दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले.
हा अपघात सोमवारी (दि. 02) सायंकाळच्या सुमारास झाला. सुरत येथील सुधीर पाटील (47) हे पत्नी ज्योती (42) यांच्यासह पारोळा तालुक्यातील लोणी येथे पुतणीच्या लग्न कार्यासाठी कारने येत होते. दरम्यान सुधीर पाटील यांच्या कारला म्हसवे फाट्यावर जळगावकडून समोरून येणाऱ्या ऑडीने जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती की, पाटील दाम्पत्याच्या कारचा चुराडा होऊन या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, समोरून धडक देणाऱ्या कारमधील शिरीष लढ्ढा, उमेश लहाने, चालक प्रवीण तागड आणि मिरज चांदे हे चारही जण नाशिक येथील असून जखमी झाले आहेत. त्यांना पारोळाच्या कुटीर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.