एकाच गुन्ह्यातील ऐतिहासिक निकाल
| पनवेल | प्रतिनिधी |
अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलून लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने पती-पत्नीला तब्बल 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावत कडक संदेश दिला आहे. पोक्सो आणि पिटा कायद्यांतर्गत एकाच गुन्ह्यात दोघांनाही शिक्षा झाल्याची ही दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना मानली जात आहे.
आश्रित म्हणून राहणाऱ्या दोन बहिणींना, त्यातील एक अल्पवयीन असताना, जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या राजेश सोनाजी शिंदे (42) व त्याची पत्नी शुभांगी सोनाजी शिंदे (37) या दांपत्याला न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावास आणि 33 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
2019 मध्ये रबाळे पोलीस ठाणे हद्दीत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने कारवाई करत दोन मुलींची सुटका केली होती. सुटका करण्यात आलेल्या मुलींनी दिलेल्या माहितीनुसार, त्या सख्ख्या बहिणी असून त्यातील एक अल्पवयीन होती. आई-वडिलांच्या निधनानंतर त्या आपल्या नातेवाईक असलेल्या शिंदे दांपत्याकडे राहात होत्या. शिक्षण घेण्याच्या वयात असतानाच या दोघींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले होते. विशेषतः अल्पवयीन मुलीकडूनही हा प्रकार करवून घेतल्याचे उघड झाले होते.
याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 370 (लैंगिक शोषण), तसेच पोक्सो कायद्यांतर्गत कलम 4, 6, 17 आणि वेश्या व्यवसायास भाग पाडण्यासंदर्भातील पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. आरोपी राजेश शिंदे याला तळोजा कारागृहात, तर शुभांगी शिंदे हिला ठाणे कारागृहात ठेवण्यात आले होते. या प्रकरणाचा खटला बेलापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (क्रमांक 2) येथे न्यायाधीश मांडवगडे यांच्या न्यायासनासमोर चालू होता. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शशिकांत इघारे यांनी प्रभावी बाजू मांडली. शुक्रवारी या खटल्याचा निकाल जाहीर झाला. न्यायालयाने सर्व आरोप सिद्ध झाल्याचे मान्य करत पती-पत्नीला 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कल्पना जाधव यांनी केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन घोडके यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले, तर तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गज्जल आणि किरण पाटील यांनी भूमिका बजावली. न्यायालयीन प्रक्रियेत संजय कांबळे यांनी अंमलदार म्हणून काम पाहिले.
