अग्नीरोधक चेंडू वर्षभर मुदतबाह्य
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आकस्मिक आग लागून जिवीतहानी अथावा वित्त हानी टाळण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये अत्याधुनीक असे अग्नीरोधक चेंडू काही वर्षांपूर्वी बसवण्यात आले होते. मात्र त्याची मुदत फेबु्रवारी 2022 मध्ये संपली असूनही धुळखात फक्त शोभेची वस्तू बनून भींतीवर राहिलेले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासह सर्वच दालनातील अग्नी रोधक चेंडूंची अशीच अवस्था आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीची अग्नी सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट होते.
शासकीय इमारतीला आग लागून मोठे नुकसान झाल्याच्या घटना गेली काही वर्षे सातत्याने घडत आहेत. त्यात मनुष्यहानी, वित्तहानी त्याचबरोबर महत्वाच्या कागदपत्रांच्या फाईल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासन मोठया प्रमाणावर खर्च देखील करीत असते. अलिबाग येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीत अग्नीशमन यंत्र लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक अधिकाऱ्यांच्या दालनात अत्याधुनीक असे अग्नीरोधक चेंडू भींतीवर लावण्यात आले आहेत. आगीची घटना घडताच सदर चेंडू त्या आगीवर फेकताच सदर चेंडूतील अग्नीशमक यंत्रणा कार्यान्वीत होऊन तात्काळ आग विझविण्यास मदत होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या दालनातील प्रतिक्षा कक्षात लावण्यात आलेल्या या अग्नी रोधक चेंडूची पाहणी केली असता त्याची मुदत संपल्याचे दिसून आले.
फेबु्रवारी 2018 मध्ये निर्मीती असलेल्या या चेंडूची मुदत फेबु्रवारी 2022 मध्ये संपूष्टात आली आहे. मात्र सदर चेंडू बदलून नवीन लावण्याची आवश्यकत असताना त्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. ऑटो फायर प्रोटेक्शन असे नाव असलेल्या या चेंडूवर मोठया प्रमाणावर खर्च करण्यात आला असताना त्याकडे होणारे दुर्लक्ष खूप धोकादायक ठरु शकते. अशाच प्रकारचे चेंडू अर्थ शाखेत, कृषी विभागात, समाजकल्याण विभागात पहायला मिळाले. प्रत्येक चेंडूखाली असलेली मुदत ही फेब्रुवारी 2022 अशी आहे. मात्र एक वर्ष होऊन देखील अक्षरशः धुळ खात पडलेल्या या अग्नि रोधक चेंडूंकडे संबंधीत कर्मचाऱ्यांचेही आणि अधिकाऱ्यांचे देखील लक्ष नाही. त्यामुळे दुर्दैवाने उद्या कोणती दुर्घटना घडली तर मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचवेळी इमारतीत असलेले अग्नीशमन यंत्र मात्र अपडेट केलेले आढळून आले.