न्हावा शेवा पोलिसांकडून तब्बल २७ हजार लिटर बायोडिझल जप्त
। जेएनपीटी ।अनंत नारंगीकर ।
इंधनाचे दिवसेंदिवस भाव वाढत असल्याने वाहतूक व्यवसाय करणारे व्यावसायिक मेटाकूटीला आले आहेत. त्यामुळे अनेक वाहन चालक, व्यावसायिक पर्यायी इंधनाचा वापर करत आहेत. उरणमध्ये अशा प्रकारे बायोडिझलच्या नावाखाली अनधिकृतपणे इंधन विक्रीचा व्यवसाय जोरात सूरू आहे. जेएनपीटी परिसरात अशाच प्रकारे बेकायदा बायोडिझेल विक्री करणाऱ्या एका लॉजिस्टीक कंपनीवर न्हावाशेवा पोलिसांनी धाड टाकून तब्बल २७ हजार ३०० लिटर बायोडिझल जप्त करण्यात आले आहे.
न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बायोडिझेल या बेकायदा विक्रीवरील धंद्यावर केलेल्या कारवाईत १० लाख रूपये किंमतीची एक केबीन, १५ लाख ५३ हजार रूपये किंमतीचा एक टँकर, २ लाख रूपये किंमतीची लोखंडी टाकी, ७० हजार रूपये किंमतीची डिझेल भरण्याची मशिन, एक मोटार आणि १५ लाख ५० हजार रूपयांचे बोगस बायोडिझल अशी लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी न्हावाशेवा पोलिसांनी टँकर चालक मृत्यूंजय कुमार जयशंकर पांडे आणि संजय बाळूभाई मशरू यांना अटक केली आहे. तर हा अनधिकृत व्यवसाय करणारे टी.एल लॉजिस्टिकी कंपनीचे मालक दिलेश गोगरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेएनपीटीच्या अनुषंगाने या परिसरात वाहतूक व्यवसाय मोठ्या प्रमाणात सूरू असतो. रोज हजारो अवजड वाहने जेएनपीटीमध्ये माल घेवून येत असतात. सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले असल्यामुळे वाहतूकीचा व्यवसाय करणे अवघड बनले आहे. त्यातच काहींनी जेएनपीटी परिसरात बायोडिझलच्या नावाखाली स्वस्त डिझेल देण्याचे अनधिकृत धंदे या सरू केले असून जेएनपीटी परिसरातील पार्कींगच्या ठिकाणी हे धोकादायक व्यवसाय बिनादिक्कीतपणे सूरू आहेत.
गुजरात किंवा बाहेरच्या राज्यातून हे बोगस इंधन येथे आणून विकले जाते. जेएनपीटी परिसरात पकडलेला हा टँकर गुजरातमधून एडीबल ऑईल (गोडेतेल) च्या नावाने आणला होता. अशा प्रकारे रोज डझनभर टँकर या परिसरात येवून हे बोगस बायोडिझल विक्री करत असतात. काही दिवसांपूर्वी उरण पोलिसांनी देखील अशा प्रकारच्या दोन कारवाया केल्या होत्या. न्हावा शेवा पोलिसांनी केलेली या कारवाई वरून किती मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सूरू असल्याचे सिद्ध होत आहे. या बाबत न्हावाशेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कर्मचारी हे अधिक तपास करत आहेत.