| पनवेल | वार्ताहर |
खारघर ग्रामपंचायतीसह पनवेल महापालिकेने खारघर दारूमुक्तीचा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे शासनाने खारघर दारूमुक्त घोषित करावे, अशी मागणी सर्व पक्षीय पदाधिकारी, तसेच सामाजिक संस्था, युवक महिला मंडळे आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून खारघरमध्ये अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
खारघर शहर हे दारूमुक्त शहर असावे, यासाठी परिसरातील विविध सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे. शासनाने खारघर शहर दारूमुक्त घोषित करावे यासाठी संघर्ष समितीच्यावतीने गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. शिवाय खारघर ग्रामपंचायत तसेच पनवेल महापालिकेने खारघर दारूमुक्तीचा ठराव मंजूर केला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जात आहे. कोपरा, खारघर, बेलपाडा, मुर्बी, रांजणपाडा, पेठ, ओवेगाव, पापडीचा पाडा इत्यादी गावांत मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत आहे. त्यामध्ये बारमालकांचा सर्वाधिक समावेश आहे. खारघर परिसरात महिन्याकाठी दारूविक्रीतून जवळपास 80 लाखांची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. एकेकाळी ‘नो लिकर झोन’ म्हणून ओळखला जाणारा खारघर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लिकर झोन म्हणून उदयास येत आहे. दरम्यान, खारघर परिसरात 20 पेक्षा अधिक अवैध दारूचे धंद्दे जोरात सुरू आहेत. खारघर पोलिसांकडून दारूबंदीसंदर्भात 85 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी दिली आहे.