वाळण-बिरवाडीत बेकायदेशीर वाळूचे उत्खनन

महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यामध्ये महसुल आणि वाळू तस्कर यांच्या मध्ये असलेल्या अर्थपुर्ण सलोख्यामुळे तालुक्यांतील वाळण आणि बिरवाडी विभागांमध्ये असलेल्या काळ नदीच्या पात्रांतुन मोठ्या प्रमाणांत वाळूचे उत्खनन केले जात आहे. यामुळे नदीलगत असलेल्या शेतीला आणि नदी किनार्‍याला धोका निर्माण झाला आहे. महसुल विभागाकडून दुर्लक्ष करण्यांत येत आहे.
कांही दिवसा पुर्वी एमआयडीसी पोलिसांनी नदीतध्ये बेकायदेशीर वाळू उत्खनन करणार्‍यांवर कारवाई केली. तरीही नदींतुन अवैद्य उत्खनन दिवस रात्र करण्यांत येत आहे. अखेर स्थानिक नागरिक एकत्र येऊन काळ नदी बचाव समितीची स्थापना करणार असल्याची माहिती स्थानिक समाज सेवक चंद्रकांत उतेकर यांनी दिली.
तालुक्यांतील अत्यंत महत्वाची असलेली काळ नदीचा उगम अत्यंत दुर्गम भाग असलेल्या वारंगी गावा जवळ होतो, डोगरदर्‍यांतुन वाहात ही नदी नडगाव गावा जवळून वाहाणार्‍या सावित्री नदीला मिळते. काळ नदीच्या किनारी असलेल्या वाघेरी, वाळण,पाने,मांघरुण,वाकी, आमशेत,काळीज, बिरवाडी,खरवली, बारसगाव, या गावांना जोडत पुढे येते. वरील कांही गावांमध्ये शासनाच्या नियमांचे उल्लंघन करुन प्रचंड प्रमाणांत वाळूचे उत्खनन दिवसरात्र करण्यांत येते.विना परवाना करण्यांत येत असलेल्या वाळू उत्खननाला महसुल विभागाकडून अभय दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातो. पोलिसांनी नुकतीच झोळीचा कोड येथे छापा मारुन लाखो रुपयांची बेकायदेशीर वाळू जप्त करुन दोनजणांवर कारवाई केली,या बाबतचा गुन्हा महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये नोंद करण्ंयात आला आहे.
डोगर कपारीतुन वाहाणारी काळ नदी वेगाने वाहाणारी नदी म्हणुन ओळखली जाते.महाडकडे जमीनीला उतार असल्याने आणि पावसाचे प्रमाण अधिक असल्याने नदीतील पाण्याचा वेग प्रचंड असतो त्याच बरोबर उतारा मुळे नदीमध्ये पाण्याचा साठा शिल्लक राहात नाही. पावसाळ्या नंतर नदीत पाणी नसल्यामुळे वाळू माफीयांकडून नदीतील वाळू काढली जाते.त्याच ठिकाणी वाळूतील जाड दगड चाळणीने काढले जातात.चाळण्यांत आलेली वाळू ट्रॅक्टरच्या मदतीने वाहातुक केली जाते.मोठ्या प्रमाणांत वाळूचे उत्खनन केले जात असल्याने पर्यावरणाला देखिल धोका निर्माण झालेला असुन अनेकांच्या जमीनीची धुप होऊन जमीनी देखिल गायब झालेल्या आहेंत.उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यावेळी नदीच्या पात्रांमध्ये खड्डे काढण्यांत येऊन पाणी काढले जाते.परंतु वारंवार वाळू काढण्यांत येत असल्याने पाण्याचा साठा देखिल नष्ट होत आहे.जिल्हाधिकारी रायगड यांनी याप्रकरणी त्वरीत कारवाई करावी अशी मागणी चंद्रकांत उतेकर व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Exit mobile version