रेतीमाफियांचे धाब दणाणले
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील गोफण गावामध्ये बुधवार, दि.11 ऑक्टोबर रोजी मंडळ अधिकारी यांनी टाकलेल्या धाडीत घराशेजारी असणारा सुमारे 22 हजारांचा अवैध 8 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. शेडसई ग्रामपंचायतील गोफण या गावी एकूण सात जणांकडे हा वाळूसाठा आढळून आला.
याबाबत अप्पर तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, रोहा यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी दिलेल्या आदेशानुसार चणेरा मंडळ अधिकारी गुरुनाथ यमाजी व तलाठी तेजेश्री मोरे यांनी वाळूसाठाप्रकरणी कारवाई केली. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे एकूण 8 ब्रास रेती आढळून आली. दरम्यान, अप्पर तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांच्या आदेशावरून तलाठी तेजश्री मोरे, मंडळ अधिकारी गुरुनाथ यमाजी व कोतवाल रवींद्र शिंदे यांनी मिळून पोलीस नाईक भास्कर शिद व पोलीस नाईक कैलास बेल्हेकर यांच्या समक्ष ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत.