| म्हसळा | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य गुटखा व पानमसाल्याच्या बेकायदेशीर साठ्यावर म्हसळा पोलिसांनी धडक कारवाई करत कुंभारआळी परिसरातून 26 हजार 136 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी भोला उर्फ रामअवतार रामाधार धिमर (46) याला अटक करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसळा पोलिसांकडून दि.20 जुलै रोजी रात्री साडेनाऊच्या सुमारास कुंभारआळी येथील एकशर शाईन कॉम्प्लेक्समधील भोला धिमर याच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान त्याने विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून ठेवल्याचे उघड झाले. कारवाईदरम्यान पोलिसांनी 21 हजार 780 रुपये किमतीचा केसरयुक्त पानमसाला, तसेच 4 हजार 356 रुपये किमतीचा 1 असा एकूण 26 हजार 136 रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला. चौकशीत हा माल माणगाव येथील शिवा काटकर याच्याकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.







