पोलादपूरात शिवार फेरी शेतकरी मेळावा
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
शेतकर्यांना लखपती बनविणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करा, असे आवाहन योजनेचे राज्य महासंचालक (भाप्रसे) नंदकुमार यांनी केले आहे. पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी येथे महाड, माणगाव व पोलादपूर क्षेत्रातील शेतकरी व अधिकारी-कर्मचारी वर्गाकरिता शिवार फेरी शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत हरित महाराष्ट्र, सुविधा संपन्न कुटुंब, समृद्ध गांव योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती झाले पाहिजे. याकरिता मनरेगाची कामे गावोगावी मोठ्या अंमलबजावणी करणे अपेक्षित आहेत. कोकणातील सातबारावर आणेवारी व खाते फोड नसल्याने लाभार्थी शेतकर्याला संमती न मिळाल्याने योजनेचा लाभ घेता येत नाही, त्यावर सामुदायिक पद्धतीने योजना राबवण्याचे आवाहन केले. तसेच, उपस्थित अधिकार्यांना संबंधित कामाविषयी शेतकर्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून, सदविवेक बुद्धी, सातत्य, आत्मविश्वास, सहकार, प्रामाणिकपणा हे गुण अवलंबून शेतकर्यांना कमीत कमी कागदामध्ये योजनेचा लाभ द्या, असे मार्गदर्शन केले. त्यानंर शिवार फेरीमध्ये जलकुंड, फळबाग लागवड, शोष खड्डे, गुरांचा गोठा, शेततळे, कंपोस्ट खड्डा आधी कामांची पाहणी करण्यात आली.
यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, राज्य गुणवत्ता व सनिंत्रण राजेंद्र शहाडे, उपजिल्हाधिकारी रोह्यो रवींद्र राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, कृषी उपसंचालक प्रवीण ठिंगळे, तहसीलदार कपिल घोरपडे, दशरथ काळे, महेश शितोळे, पोलादपूर गटविकास अधिकारी दीप्ती गाट, डॉ. स्मिता पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे यांच्यासह निलेश घुगे, सुमित गोरले, किसन भोसले, किशोर जाधव, श्रीरंग मोरे, भरत कदम, डॉ. दत्तात्रय भिसे, मनोज जाधव, सुशांत जगताप, भिकाजी मांढरे, सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तलाठी, कृषी अधिकारी मंडळाधिकारी, विस्ताराधिकारी, रोजगार सेवक व शेतकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन दरेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संपर्क अधिकारी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्रामस्थ मंडळ व ग्रामपंचायत, तालुका कृषी, पंचायत समिती, तहसील यांनी विशेष सहकार्य केले.