अजित नैराळे, आयुब तांबोळी यांना पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप
। खोपोली । वार्ताहर ।
कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे आणि तहसीलदार आयुब तांबोळी या दोन्ही अधिकार्यांची बदली झाली आहे. या दोन्ही अधिकार्यांनी येथील तीन वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य माणूस त्यातही आदिवासी व मागासवर्गीय, वंचित समाजातील घटकातील नागरिकांना केंद्रबिंदू ठेवत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवून या योजनांच्या माध्यमातून न्याय दिला आहे. शनिवारी खालापूर महसूल विभाग व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या दोन्ही अधिकार्यांना निरोप देण्यासाठी खास निरोप समारंभ येथील युकेज रिसॉर्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. भव्य मिरवणूक, फटाक्यांची आतिषबाजी करून वाजतगाजत या अधिकार्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत निरोप देण्यात आला. यावेळी सर्वच नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व महसूल विभागातील सर्व स्तरातील अधिकार्यांना गहिवरून आले.
मागील वर्षांतील पावसाळी हंगामातील इर्शाळवाडी दुर्घटना, खंडाळा घाटात बस दरीत कोसळण्याची मोठी दुर्घटना तसेच अन्य कोणत्याही आपत्कालीन घटनांच्या प्रसंगी प्रांतअधिकारी अजित नैराळे व तहसीलदार आयुब तांबोळी यांनी प्रशासन किती गतिमान व सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करू शकते हे दाखवून दिल्याने या दोन्ही अधिकार्यांप्रति सर्व स्तरात प्रचंड आदराची भावना निर्माण झाली. इर्शाळवाडीची दुर्घटना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. धो-धो मुसळधार पाऊस, अतिदुर्गम व उंच डोंगरावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही, वाहन जाऊ शकत नसतांना त्याच रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास तेथे प्रत्यक्ष पोहचून मदतकार्य सुरू करण्याचा विक्रम याच दोन्ही अधिकार्यांच्या नावावर आहे. त्यासाठी त्यांना उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून राज्यस्तरावर सन्मानीतही करण्यात आले आहे. आदिवासी जमिनीचा प्रश्न, उद्योग व्यवसाय संबंधीतील समस्या, रेशन कार्डपासून, जमीन हस्तांतरणचे रखडलेले प्रकरणे अशा सर्व बाबतीत गतिमान निर्णय प्रक्रिया राबवून या दोन्ही अधिकार्यांनी खालापूर व कर्जत तालुक्यातील सर्वच स्तरातील नागरिकांना दिलासा देत नागरिकांच्या मनात आदराचे घर निर्माण केले होते.
शासकीय नियमांप्रमाणे कर्तबगार दोन्ही अधिकार्यांची एकाचवेळी बदली झाल्याने त्यांना निरोप देतांना दोन्ही तालुक्यातील नागरिकांना प्रचंड गहिवरून आले. महसूल विभाग खालापूर, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था व अन्य सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून शनिवारी हा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या डोळ्यात वारंवार अश्रू अनावर झाले. त्यांची ही सहावी पोस्टिंग असून आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात आनंददायी व कोणत्याही उपक्रमात, योजनेत नागरिकांचा सक्रिय सहभाग मी खालापूरमध्ये अनुभवला हे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच येथील सामाजिक सलोखा उचकोटीचा असून भविष्यातही हा सामाजिक सलोखा असाच कायम टिकवण्यासाठी आयुब तांबोळी यांनी सर्वांना आवाहन केले.
तर प्रांत अधिकारी अजित नैराळे यांनीही तीन वर्षातील विविध अनुभव व आव्हानात्मक परिस्थितीतही आपण व तहसीलदार आयुब तांबोळी कशी वाटचाल केली व त्याला येथील जनता, सामाजिक संस्था, सर्वपक्षीय राजकीय नेते, लोकप्रतिनिधीची उत्तम साथ कशी मिळाली याच्या आठवणींना उजाळा दिला. सर्वांच्या ऋणात कायम राहत असेच उत्तमातील उत्तम काम भविष्यातही आम्ही करणार असल्याचे सांगून कणखर अधिकारी असूनही पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी निरोप घेतला.
याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हासराव देशमुख, शिवसेनेचे डॉ.सुनील पाटील, भाई शिंदे, एकनाथ पिंगळे, नवीन घाटवल, नरेश पाटील, संदीप पाटील, नगरसेवक किशोर पानसरे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुपचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.