। नवी मुंबई । वार्ताहर ।
मोहने येथील गावदेवी मंदिरावर केडीएमसीच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून संतप्त जमावाचा पालिका अधिकार्यांसोबत वाद झाला. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. पाटील यांनी मोहने येथील मंदिराच्या घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक भूमिपुत्रांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे त्यांनी शिष्टमंडळासोबत कल्याण परिमंडळ 3 च्या पोलिस उपायुक्तींची भेट घेऊन स्थानिक भूमिपुत्रांवरील गुन्हे मागे घेण्याची व मंदिर उभारण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. मोहने येथे जुने गावदेवीचे मंदिर होते. ते मंदिर जीर्ण झाले असल्यामुळे स्थानिक गावकर्यांच्या लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू आहे परंतु कोणतीही नोटीस न देता महापालिकेच्यावतीने सदरच्या बांधकामावर कारवाई करण्यात आल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी मनपा प्रशासनाने मंदिराच्या कामात सहकार्य करणे गरजेचे आहे. अन्यथा स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आंदोलनाचा पवित्रा घेतील असे पाटील यांनी सांगितले. तसेच सर्व ग्रामस्थांनी शांत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी आ. विश्वनाथ भोईर, माजी आ. नरेंद्र पवार,देवानंद भोईर, सुभाष पाटील. अॅड. भावेश पाटील, सतीश देशेकर,अशोक मुरकुटे,सुभाष भाबडे तसेच कोळी महासंघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.