| मुंबई | प्रतिनिधी |
पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध प्रश्नांवर आपले मत मांडताना सरकारला धारेवर धरत आसूड ओढले. पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या अंधश्रद्धा, महिला अत्याचार, हुंडाबळी यांसारख्या घटना वारंवार घडत आहेत, हे शिव, फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. मुलींच्या शिक्षणाबाबत असरच्या अहवालातून मिळणारी माहिती समाधानकारक नाही. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन महाराष्ट्र सरकारने हे वर्ष सामाजिक परिवर्तनासाठी आणि महिला अत्याचार व मुलींच्या शिक्षणासाठी द्यावं, असे सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
सर्वांनी मिळून सामाजिक परिवर्तनासाठी काम करण्याची गरज आहे. अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांना धमक्या मिळत असताना, त्यांपैकी एकाही महिलेला तक्रार करण्याचा आत्मविश्वास समाज म्हणून आपण का देऊ शकलो नाही. एक यंत्रणा आणि व्यवस्था म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत का? असा खोचक प्रश्न करत या सर्व प्रश्नांचा आणि घटनांचा गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे, असेही सुळे यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.
महाराष्ट्र सरकारने हे वर्ष सामाजिक परिवर्तनासाठी महिला अत्याचार आणि मुलींच्या शिक्षणाासाठी द्यावं, असे खा. सुळे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आणि युवती काँग्रेसने ठरवले आहे की, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना घडतील, त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना भेटून भोंदूबाबांकडून होणाऱ्या महिलांवरील अत्याचार आणि छळाविरोधात आवाज उठवला जाईल आणि तो थांबवण्यासाठी राज्यभर मोहीम राबवली जाईल. अजित पवार यांच्या दुर्घटनेबाबत रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. मात्र, त्यावर कारवाई का केली जात नाही? या दुर्घटनेमागील कारण काय? यासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, एवढीच आमची अपेक्षा आहे, अशी सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे.
महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे
