एमएमआरडीएचा अजब कारभार! फलकावरच मराठीची तोडमोड

‘कळंबोली‌’चे ‌‘कलंबोली‌’, तर ‌‘करंजाडे‌’चे ‌‘कारंजाडे‌’

| ‌पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पळस्पे फाटा ते डी-पॉईंट या महत्त्वाच्या जेएनपीए महामार्गावरील कॉलेज फाटा येथे लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर स्थानिक परिसरांची नावेच चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अखत्यारितील या मार्गावरील अधिकृत फलकावर ‌‘कळंबोली‌’चे नाव ‌‘कलंबोली‌’, तर ‌‘करंजाडे‌’चे नाव ‌‘कारंजाडे‌’ असे छापण्यात आले आहे. सरकारी यंत्रणेच्या फलकावरच मराठी नावांची तोडमोड झाल्याने स्थानिक नागरिक आणि मराठीप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पळस्पे फाटा ते डी-पॉईंट हा जेएनपीए बंदर, कळंबोली, करंजाडे यांसह परिसरातील महत्त्वाच्या भागांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, प्रवासी वाहने तसेच स्थानिक नागरिकांची वाहतूक सुरू असते. वाहनचालकांना योग्य दिशा मिळावी यासाठी कॉलेज फाटा येथे एमएमआरडीएकडून मोठा दिशादर्शक फलक उभारण्यात आला आहे. मात्र, या फलकावरील स्थानिक भागांच्या नावांचेच चुकीचे शुद्धलेखन करण्यात आल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

‌‘कळंबोली‌’ या नावातील ‌‘ळ‌’चा ‌‘ल‌’ करून ‌‘कलंबोली‌’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ‌‘करंजाडे‌’ या प्रचलित नावाचे ‌‘कारंजाडे‌’ असे चुकीचे लेखन करण्यात आले आहे. फलक तयार करण्यापूर्वी त्यावरील नावांची साधी शुद्धलेखन तपासणीही करण्यात आली नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, हा काही खासगी संस्थेचा फलक नसून सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेला अधिकृत दिशादर्शक फलक आहे. त्यामुळे अशा फलकांवर स्थानिक ठिकाणांची नावे अचूक आणि प्रमाण मराठीत असणे अपेक्षित आहे. मात्र, संबंधित अधिकारी व कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे मराठी भाषेचीच हेळसांड होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

दरम्यान, कॉलेज फाटा येथील या फलकाची एमएमआरडीए प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चुकीची नावे दुरुस्त करावीत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पराग बालड यांनी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या सर्व दिशादर्शक फलकांवरील मराठी नावांची योग्य शुद्धलेखन तपासणी करूनच ते लावण्यात यावेत, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

Exit mobile version