श्रीवर्धनमधून करणार प्रचाराचा श्रीगणेशा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आरडीसीसी बँकेच्या श्रीवर्धन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी इंडिया आघाडीचे नेते शुक्रवारी (दि.27) प्रथमच रायगड जिल्ह्यात एकत्र येणार आहेत. जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या रायगडातील प्रचाराला त्यादिवशी सुरुवात होणार असून त्याचा श्रीगणेशा श्रीवर्धनमधून होणार असल्याचं बोललं जात आहेे.
अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर खा. सुनील तटकरे यांच्या मतदार संघात इंडिया आघाडीची होणारी ही पहिलीच सभा आहे. इंडिया आघाडीतील दिग्गज नेतेमंडळी या सभेस उपस्थित राहणार आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रीवर्धन शाखेचे उद्घाटन शुक्रवारी संपन्न होणार आहे. हा सोहळा माजी कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीस अवजड मंत्री अनंत गीते, आ. अबु आझमी, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी खा. हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडीत पाटील, माजी. आ. बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या क्रार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन आरडीसीसी बँकेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील व उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी केले आहे.
बंदोबस्तासाठी पोलीस फौजफाटा तैनात
शाखेच्या उदघाटनंतर कोकण उन्नती मित्र मंडळ, मुंबई यांच्या पटांगणात दुपारी 3 वाजता जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी मोठा मंडप उभारण्यात आला असून सभेची जय्यत तयारी सुरु आहे. येणाऱ्या मान्यवरांसाठी झेड प्लस सुरक्षा तैनात केली असून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये 2 उपविभागीय पोलीस अधीक्षक, 5 पोलीस निरीक्षक, 14 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 136 पोलीस आंमलदार तर कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून 40 वाहतूक शाखेचे पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.