। चेन्नई । वृत्तसंस्था ।
मध्यांतरच्या 1-3 अशा पिछाडीनंतर एका मिनिटात दोन गोल आणि अंतिम क्षणी निर्णायक गोल करणार्या भारताने मलेशियाचा 4-3 असा पराभव केला आणि आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत चौथ्यांदा विजेतेपद मिळवले. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहणार्या भारताने साखळी सामन्यात मलेशियाचा 5-0 असा धुव्वा उडवला होता, मात्र अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी कमालीचा संघर्ष करावा लागला. भारताकडून करण्यात आलेले चारही गोल वेगवेगळ्या खेळाडूंनी केले.
ज्युगराग सिंग, कर्णधार हरमनप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी गोल केले. यातील हरमनप्रीत आणि गुरजंत सिंग यांनी एका मिनिटात केलेले गोल भारताचा जीवदान देणारे ठरले. जपानचा 5-0 असा धुव्वा उडवणार्या भारतीय संघाचा आत्मविश्वास आजच्या अंतिम सामन्यासाठी उंचावला होता. सामन्यात तशी शानदार सुरुवातही केली आणि नवव्याच मिनिटाला ज्युगराजने गोल केला. त्यानंतर भारताला पेनल्टी कॉर्नर मिळत गेले; परंतु गोल काही त्यावर होत नव्हते. साखळी सामन्यातील अनुभवातून मलेशियाने आज आपला बचाव भक्कम केला होता. या दरम्यान कर्णधार हरमनप्रीत सिंग प्रयत्न करत होता; परंतु यश येत नव्हते.
14 व्या मिनिटाला अबू आरझीने मलेशियाचे खाते उघडले. त्यानंतर पुढच्या 12 मिनिटांत मलेशियाने आणखी दोन गोल केले आणि मध्यांतराला 3-1 अशी आघाडी घेतली.
दोन गोलांच्या पिछाडीनंतर भारतीय संघ दडपणाखाली आला होता, पण 45 व्या मिनिटाला हरमनप्रीत आणि गुरजंत सिंग यांनी गोल करताच स्टेडियममध्ये जल्लोषाला उधाण आले. गोलफलक 3-3 अशा बरोबरीत होता.
निर्णायक गोल करण्यासाठी भारतीयांकडून अधिक जोर लावण्यात येत होता. या दरम्यान हरमनप्रीतकडून एक संधी वाया गेली; परंतु आकाशदीप सिंगने 56 व्या मिनिटाला गोल केला आणि भारताला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्या चार मिनिटांच्या खेळात भारतीयांनी आक्रमणाची धार अधिक तेज केली, त्यामुळे मलेशियाला प्रत्युत्तर देण्याची संधीच मिळाली नाही.