विराट, रोहितकडून चाहत्यांची निराशा; ऑस्टोलियाची मालिकेत आघाडी
| पर्थ | वृत्तसंस्था |
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या 224 दिवसांनी पुनरागमनाच्या उत्सुकतेपोटी चाहते रविवारी (दि.19) पर्थच्या स्टेडियमवर आले होते. परंतु, हे दोन्ही दिग्गज अपयशी ठरले. त्यांच्यासह संपुर्ण संघानेही निराश केले. त्यामुळे ऑस्ट्रोलियाच्या डावपेचांसमोर भारताची सपशेल हार झाली. तसेच, आतापर्यंत पर्थवर एकही एकदिवसीय सामना न जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने ही मालिका खंडित केली. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यादरम्यान भारताच्या मार्गात पावसाने खोडा घातला आणि त्यामुळे वारंवार षटके कमी करण्यात आली. शेवटी 26 षटकांचा सामना खेळवण्यात आला. त्यामुळे आधीच पडझड झालेला डाव आणि संथ झालेल्या खेळपट्टीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. लोकेश राहुल हा भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 31 चेंडूंत 38 धावा केल्या. त्यापाठोपाठ अक्षरने 38 चेंडूंत 31 धावांची खेळी केली. नितीश कुमारने नाबाद 19 धावा करताना संघाला 9 बाद 136 धावापर्यंत पोहोचवले. परंतु, ऑस्ट्रेलियासमोर 26 षटकांत 131 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेझलवूड, मिचेल ओवेन व मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार मिचेल मार्शने ऑस्ट्रेलियाला आक्रमक सुरुवात करून दिली. परंतु, ट्रॅव्हिस हेड (8) व मॅथ्यू शॉर्ट्स (8) यांना स्वस्त्यात माघारी परतावे लागले. त्यानंतर मार्श मैदानावर उभा होता आणि त्याने संघाला 10 षटकांत 50 धावांच्या पुढे पोहोचवले. जॉश फिलिपे व मार्श यांनी 55 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला विजयासमीप आणले. परंतु, फिलिपे 29 चेंडूंत 37 धावांवर बाद झाला. मात्र, ऑस्ट्रेलियाने 7 गडी राखून हा सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मार्श 52 चेंडूंत 46 धावांवर नाबाद राहिला, तर रेनशॉने नाबाद 21 धावा केल्या.
विराट कोहलीचा लाजिरवाणा पराक्रम
विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन काही खास राहिले नाही. यावेळी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती; परंतु, ती उत्सुकता 8 चेंडूंपुरतीच मर्यादित राहिली. मिचेल स्टार्कने त्याला भोपळ्यावर बाद केले आणि 13 वर्षांत प्रथमच तो ऑस्ट्रेलियात एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाला. याशिवाय त्याने स्वतःच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम नावावर केला आहे. त्याने धावांचे खाते न उघडून रोहित शर्मा व सौरव गांगुली यांच्या नावावर असलेला नकोसा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. आतापर्यंत तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे देखील बऱ्याच काळानंतर या सामन्यात भारतीय संघाकडून खेळले. या सामन्यासह, रोहित शर्माने एक विशेष टप्पा गाठला आहे. हा भारतासाठी त्याचा 500वा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याच्या आधी फक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविड यांनी भारतासाठी 500पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. रोहित भारतासाठी 500 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा एकूण पाचवा खेळाडू ठरला आहे.





