आयएसएलकडून फुटबॉलपटूंना मुक्त करण्यास नकार
। नवी दिल्ली। वृत्तसंस्था ।
चीनमधील हांगझाऊ येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर यादरम्यान होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा दुय्यम फुटबॉल संघ उतरणार आहे. दिग्गज खेळाडू सुनील छेत्री, बचावपटू संदेश झिंगन व गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू या अनुभवी खेळाडूंना भारतासाठी खेळता येणार नाही. इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहभागी होणार्या क्लब्सकडून फुटबॉलपटूंना आशियाई स्पर्धेमध्ये खेळण्याची परवानगी दिली नसल्याने प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेमध्ये 23 वर्षांखालील संघातील खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून आशियाई स्पर्धेसाठी उशिराने संघ निवड करण्यात आली. भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून आशियाई स्पर्धेच्या आयोजकांना उशिराने संघ पाठवण्याची परवानगी मागण्यात आली होती. ही मागणी मान्य करण्यात आली. त्यानंतर भारतीय फुटबॉल संघाची निवड करण्यात आली. या संघामध्ये सुनील छेत्री, संदेश झिंगन व गुरप्रीत सिंग संधू यांचा समावेश होता. आशियाई स्पर्धा 23 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तसेच भारतामध्ये आयएसएल या फुटबॉल स्पर्धेला 21 सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे.
दोन्ही स्पर्धा एकाच वेळी होत असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. भारतीय फुटबॉल संघटनेच्या कार्यकारी समितीकडून या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते; मात्र आयएसएल क्लब्स खेळाडूंना मुक्त करण्यास तयार नाहीत. फिफाच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात आशियाई स्पर्धेचा समावेश नाही. त्यामुळे आम्ही खेळाडूंना त्या स्पर्धेसाठी सोडू शकत नाही. असा सूर आयएसएल क्लब्सकडून उमटत आहे. भारतीय संघ 16 सप्टेंबरला चीन येथे आशियाई स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. भारताचा 23 वर्षांखालील संघ चीनमध्ये आशियाई 23 वर्षांखालील करंडकाची पात्रता फेरी खेळत आहे. अशा परिस्थितीत भारतीय फुटबॉल संघटना व भारतीय ऑलिंपिक संघटना यांच्याकडे फक्त चार दिवस शिल्लक आहेत. यादरम्यान कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.