झिम्बाब्वेला 35 धावांनी हरवत क्लीन स्वीप
| हरारे | वृत्तसंस्था |
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्याच्या टी 20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्या टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 35 धावांनी धुव्वा उडवला. भारताने झिम्बाब्वेला पराभूत करून विजयाची हॅटट्रिक मारली आणि झिम्बाब्वेचा क्लीन स्वीप केला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि झिम्बाब्वेला गोलंदाजीचे आव्हान दिले. वैभव सूर्यवंशीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने 20 षटकांमध्ये 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात, झिम्बाब्बेने 20 षटकांमध्ये फक्त 156 धावाच करु शकला. श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारताचा हा पहिला टी 20 मालिका विजय आहे. यापूर्वी, त्याच्या कर्णधारपदाखाली भारताला आयर्लंड आणि इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली. अभिषेक शर्मा ब्लेसिंग मुझारबानीच्या गोलंदाजीवर फक्त 2 धावा करुन बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या ईशान किशनने वैभव सूर्यवंशीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 75 धावा जोडल्या. 11 व्या षटकात सिकंदर रझाने ईशान किशनला बाद केले आणि भारताला दुसरा विकेट पडली. ईशान किशनने चार चौकारांच्या मदतीने 28 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या. भारताची तिसरी विकेट 15 व्या षटकात वैभव सूर्यवंशीच्या रूपाने पडली. शतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला वेस्ली माधवरेने बाद केले. वैभव सूर्यवंशीने 49 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि चार षटकारांसह 81 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर 18 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ब्रेड इव्हान्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. श्रेयस अय्यरने दोन चौकारांच्या मदतीने 18 चेंडूंमध्ये 27 धावा केल्या. तिलक वर्मा 11 धावा करुन नाबाद राहिला, तर रिंकू सिंग डावाच्या शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. रिंकू सिंगने दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 14 चेंडूंमध्ये 25 धावा केल्या. भारताने 20 षटकांत पाच विकेट्स गमावून 192 धावांचा डोंगर उभा केला. लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची फलंदाजी खराब होती, परंतु रायन बर्लने दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. परंतु, त्याचे अर्धशतकही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. बर्ल 43 चेंडूंमध्ये पाच चौकारांसह 54 धावांवर नाबाद राहिला.







