1500 ते 4000 रुपये पेटीचा दर
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
वातावरणातील उष्णता वाढल्याने यंदा आंब्याचे फळ लवकर तयार झाले आहे. त्यामुळे बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. परिणामी, स्थानिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा पाहायला मिळत असून आखाती देशांबरोबरच युरोपीय देशांतही आंब्याची निर्यात सुरू झाली आहे. आखाती देशांबरोबर युरोपीय देशांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात केली जाते. आखाती देशांत आंब्याची निर्यात करण्यासाठी कोणतेही निर्बंध नसल्यामुळे पॅकिंग केलेला आंबा थेट निर्यात केला जात आहे.
मात्र, युरोपीय देशांत आंबा निर्यातीसाठी काही निर्बंध आहेत. त्यामुळे हॉट वॉटर ट्रीटमेंट करूनच आंबा निर्यात करावा लागतो. तसेच निर्यात करताना त्याचे प्रमाणपत्र जोडावे लागते. त्यानुसार आता आंब्याची निर्यात सुरू झाली असून दुबईसोबत लंडनमध्ये आंब्याची पहिली खेप रवाना झाली आहे. अशातच सध्या आंब्यांचे दर 1500 ते 4000 रुपये पेटी असल्यामुळे आंबा निर्यात करणे व्यापार्यांनाही सोयीस्कर ठरत आहे.
90 टक्के निर्यात समुद्रमार्गे
आंबा निर्यात करण्यासाठी समुद्रमार्गे आणि हवाई मार्गाने पाठवला जातो. मात्र सर्वाधिक निर्यात ही समुद्र मार्गानेच होते. हवाई मार्गाने केवळ 10 टक्के निर्यात होते. 90 टक्के आंबा समुद्री मार्गाने निर्यात होतो. हवाई मार्गाने निर्यात करताना वाहतूक खर्च जास्त येतो. त्यामुळे समुद्री मार्ग सोयीस्कर पडतो.
आंब्याचा हंगाम बहरत आहे. बाजारपेठ खुली होत आहे. त्यानुसार आंबा निर्यात सुरू करण्यात आली. मात्र यावेळी आंब्याचा हंगाम चांगला जाणार असल्याचे दिसत आहे. – मोहन डोंगरे, आंबा निर्यातदार