ऋतुराज, मोईनची चमक
| चेन्नई | वृत्तसंस्था |
सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (31 चेंडूंत 57 धावा) अर्धशतकानंतर मोईन अलीच्या (26 धावांत 4 बळी) प्रभावी मार्याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर 12 धावांनी विजय मिळवला.
चेन्नईने दिलेल्या 218 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्या लखनऊनेही चांगला प्रारंभ केला. सलामीवीर काएल मेयर्सने (22 चेंडूंत 53 धावा) आक्रमक खेळी केली. कर्णधार केएल राहुल (20) आणि मेयर्सने पहिल्या गडयासाठी 79 धावांची भागिदारी रचली. मेयर्सला मोईन अलीने बाद केले. यानंतर दीपक हुडाच्या (2) रुपात संघाला दुसरा धक्का बसला. मग राहुल, कृणाल पंडया (9) आणि मार्कस स्टोइनिसला (21) मोईनने बाद करत चेन्नईची अवस्था 5 बाद 130 अशी बिकट केली. निकोलस पूरनने (32) काही आक्रमक फटके मारले. अखेरीस आयुष बदोनी (23) आणि कृष्णप्पा गौतम (नाबाद 17) यांनी धावा केल्या. मात्र, त्यांची मेहनत अपुरी पडली. वूडने अखेरीस येऊन एक चौकार व एक षटकार मारले. मात्र, संघाला त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे लखनऊला 20 षटकांत 7 बाद 205 धावा करता आल्या. चेन्नईकडून मोईनला तुषार देशपांडेची (2/45) साथ मिळाली.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या सामन्यात आक्रमक खेळी करणार्या ऋतुराजने या सामन्यातही आपलीही लय कायम राखली. त्याला कॉन्वेचीही साथ मिळाली. दोघांनी पहिल्या गडयासाठी 110 धावांची भागिदारी रचली. ऋतुराजने आपल्या खेळीत 3 चौकार व 4 षटकार मारले. रवी बिश्नोईने ऋतुराजला बाद करत ही भागिदारी मोडीत काढली. कॉन्वेही बाद झाल्यानंतर शिवम दुबे (27), अंबाती रायुडू (नाबाद 27) आणि मोईन अली (19) यांनी फटकेबाजी करत चेन्नईची धावसंख्या 20 षटकांत 7 बाद 217 पर्यंत पोहोचवली. लखनऊकडून बिश्नोई (3/28) आणि वेगवान गोलंदाज मार्क वूड (3/49) यांनी चांगली गोलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : 20 षटकांत 7 बाद 217 (ऋतुराज गायकवाड 57, डेव्हॉन कॉन्वे 47, अंबाती रायुडू नाबाद 27; रवी बिश्नोई 3/28, मार्क वूड 3/49)
लखनऊ सुपर जायंट्स : 20 षटकांत 7 बाद 205 (काएल मेयर्स 53, निकोलस पूरन 32; मोईन अली 4/26, तुषार देशपांडे 2/45)