दोघेजण गंभीर जखमी
| सुकेळी | वार्ताहर |
महामार्गावर मागील दोन महिन्यांपासून अपघातांची संख्या ही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दररोज अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोठे ना कोठेतरी अपघात घडत आहेत. रविवार, दि.8 मे रोजी पहाटे 3.45 वाजतादेखील महामार्गावरील सुकेळी गावाच्या हद्दीमध्ये इनोव्हा कारला अपघात होऊन दोघेजण गंभीररित्या जखमी झाले.
याबाबतीत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरुन महामार्गावरुन महाड बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणारी इनोव्हा गाडी क्र. एम.एच. 04 डी.डब्ल्यू. 5365 या गाडीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या 20 फूट मोरीच्या खड्ड्यामध्ये पडल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात कार चालक हिरालाल आनंदराव कांबळे तसेच प्रवासी लता किशोर पाटकर (51) रा. अंधेरी, मुंबई हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने ऐनघर पोलिसांमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांना प्रथमोपचार करुन पुढील उपचारांसाठी पनवेल येथे पाठवण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.